पुणे: एका मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करून पोलिस थकले होते. सर्व प्रकारचे प्रयत्न करून देखील आरोपी मिळून येत नाही म्हटल्यानंतर गुन्ह्याची फाईल बंद करण्याचे ठरले. मात्र, खडकी पोलिसांनी 'ऑपरेशन मूनलाईट'द्वारे या अतिशय गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या तर ठोकल्याच; पण या गुन्ह्याचे सत्य देखील पुढे आणले. पीडित मुलीने तरुणाच्या आणि घरच्यांच्या भीतीपोटी झालेल्या प्रकाराबद्दल कोठेही वाच्यता केली नव्हती. याप्रकरणी पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी तरुणाला सहा महिन्यांनंतर अटक केली.
फेब्रुवारी 2025 मध्ये शहरातील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात दाखल झालेली 14 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे पुढे आले. याबाबत रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली. लैंगिक अत्याचाराचा प्रकार असल्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मुलीकडे चौकशी करण्यात आली, त्या वेळी तिने सांगितले, गेमिंग अॅपवर गेम खेळत असताना एका मुलासोबत ओळख झाली. त्याने माझ्यावर अत्याचार केला. त्याचा मोबाईल नंबर माहीत नाही. चेहराही पाहिलेला नाही.त्याने तोंडाला मास्क लावले होते. त्याचे नाव राहुल आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा घडल्याचे ठिकाण खडकी पोलिस ठाण्याची हद्द असल्यामुळे तो गुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. महिला पोलिस उपनिरीक्षक रेखा दिघे यांच्याकडे सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. त्यांनी बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांचा तपास केला आहे.
तांत्रिक विश्लेषण असे सर्व
पर्याय वापरले. गेम कंपनीकडून देखील काही माहिती मिळाली नाही. चार महिने तपास केल्यानंतर काहीच प्रगती नाही म्हटल्यावर तपास ठप्प झाला. पीडित मुलगी तपासात सहकार्य करत नव्हती. घटनास्थळ झोपडपट्टी परिसरात असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्नच नव्हता. दरम्यान, वरिष्ठ अधिकार्यांकडे आरोपीची ओळख पटू शकत नसल्याचा अहवाल गेला. मात्र, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा गुन्हा पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्याकडे देण्यात आला. चौगले यांनी तंत्रज्ञानावर आधारित तपासाबरोबरच पारंपरिक पद्धतीने तपासाला सुरुवात केली.
...अखेर 'तो' सापळ्यात अडकला!
खडकी पोलिसांच्या हाती थोडी माहिती लागली होती. त्यानुसार पोलिस पथकाने वेशांतर करून कोंढवा परिसरात सापळा लावला. त्यासाठी पोलिस वडापाव विक्रेत्यापासून ते दुकानातील सेल्समनपर्यंत सज्ज होते. मुलगी बाहेर पडली. तिच्या चेहर्यावरील भीतीचा भाव स्पष्ट दिसत होता. एका गल्लीकडे जाताना पोलिसांनी तिला अचूक पाहिले. काही वेळात सावध असलेला एक तरुण तिच्यासमोर येऊन थांबला.दोघांचे संभाषण सुरू होते. मात्र, पोलिस असल्याची चाहूल लागताच तरुण पळून जाऊ लागला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत ना तो राहुल होता, ना तो दिल्लीचा होता, ना तो गेमच्या माध्यमातून ओळखीचा होता. तो तर त्याच परिसरातील राहणारा होता. पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.त्यातून ती गर्भवती राहिली. जेव्हा हा प्रकार समोर आला, तेव्हा तिने घरच्यांच्या आणि तरुणाच्या भीतीपोटी वेगळीच कहाणी पोलिसांसमोर कथन केली. पोलिस देखील त्याचदृष्टीने छडा न लागणार्या एका गुन्ह्याचा तपास करीत होते. पीडित मुलीला महिला दक्षता कमिटीने विश्वासात घेऊन विचारले असता, तिने भीतीपोटी नाव न सांगितल्याचे म्हटले. पोलिसांनी मुलीचा पुरवणी जबाब घेऊन आरोपी तरुणाला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, दत्तात्रय बागवे, तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले, रेखा दिघे, कर्मचारी सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, अनिकेत भोसले, शशांक डोंगरे, दिनेश भोऐ, प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे यांनी पार पाडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.