गाड्या थांबल्या, टोळी उतरली आणि तिघांना बेदम मारलं, भर रस्त्यात थरार... बीडमध्ये पुन्हा मोठं प्रकरण
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून घडलेल्या एका हिंसक घटनेनं खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख प्रकरणाची आठवण करून देणारी ही घटना आष्टी परिसरात घडली असून, 15 जणांच्या टोळक्याने सिनेस्टाईल पाठलाग करत तिघांना बेदम मारहाण केली. यामध्ये एका महिलेलाही जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शारदा बाळासाहेब ढोबळे, अमित बाळासाहेब ढोबळे आणि सुमित बाळासाहेब ढोबळे यांनी शेतजमिनीच्या वादावरून आष्टी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. त्यांनी महादेव आश्राजी नरवडे, निखिल महादेव नरवडे आणि प्रतिभा महादेव नरवडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर घरी परतत असताना कासारी नदीच्या पुलावर 15 जणांच्या टोळक्याने सुमित ढोबळे यांची स्विफ्ट गाडी अडवली. तोंडाला रुमाल बांधलेल्या या आरोपींनी गाडीच्या काचा फोडल्या आणि तिघांवर हल्ला चढवला. यामध्ये शारदा ढोबळे या महिलेलाही पुरुष आणि युवकांनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात सुमित, अमित आणि शारदा ढोबळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने ढोबळे कुटुंब भयभीत झाले आहे. संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला, तरी या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.