Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काेल्हापूर हादरलं! 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीचा खून

काेल्हापूर हादरलं! 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीचा खून
 

कोल्हापूर : चार महिन्यांपासून 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने चाकूने भोसकून तिचा खून केल्याची घटना सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे घडली. समीक्षा ऊर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३, रा.दत्त मंदिर रोड, कसबा बावडा) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सतीश यादव (वय २७, रा. उन्ड्री, ता. पन्हाळा, सध्या रा. साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, समीक्षा ऊर्फ सानिका हिचे २०१९ मध्ये लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणाशी लग्न झाले होते. पण, सहाच महिन्यांत दोघांनी वादामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट होते. दरम्यान, सानिकाने तिची मैत्रीण आयुषी अंम्पले (मूळ रा. तेलंगाणा) हिच्यासोबत इव्हेन्ट मॅनेजमेंटची कामे सुरू केली होती. यातून तिची ओळख सतीश यादव याच्याशी झाली. तिघेही गेले चार महिने सरनोबतवाडीत फ्लॅटवर राहात होते. 
 
लग्न, बारसे, जावळ यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन तिघांनी एकत्रितपणे घेतले होते. त्यासाठी लागणारे साहित्यही खरेदी करून ते सरनोबतवाडीतील फ्लॅटवर आणले होते. यामुळे कसबा बावड्यातून सानिकाही आई व बहिणीपासून वेगळी सरनोबतवाडीत फ्लॅटवर राहू लागली. पण, काही दिवसांपासून सतीश तिला लग्नाची मागणीही घालत होता. सानिकाला त्याच्याशी लग्न करायचे नसल्याने दोघांत वाद झाला होता. दरम्यान, लग्नाचा सिझन संपल्याने फ्लॅटचे भाडे देणे तिघांना परवडणारे नव्हते, यामुळे त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला.



चार दिवसांपूर्वी त्यांनी फ्लॅटही सोडला, पण त्यांचे साहित्य तिथेच होते. घरमालकाने हे साहित्य घेऊन जाण्यासाठी आज सानिकाला फोन केला. यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सानिका व आयुषी फ्लॅटवर गेले. यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत सतीश यादवही तिथे आला. यावेळी तेथे सतीशचा सानिकासोबत वाद झाला. यावेळी आयुषी साहित्य भरत होती. इतक्यात सतीशने स्वतःजवळील चाकू सानिकाच्या छातीत खुपसला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून मैत्रीण आयुषी हॉलमध्ये पोहोचली. मात्र, सतीश फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन सानिका जागीच कोसळली. फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्याने आयुषीने आरडाओरडा सुरू केला.
सानिका कोसळल्याने तिच्यावर उपचारासाठी आयुषीची धडपड सुरू होती. तिने सानिकाच्या एका मित्राला फोनवरून माहिती दिली. तो तातडीने फ्लॅटजवळ दाखल झाला. त्याने बाहेरून लावलेली कडी काढली व सानिकाला एका खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच, गांधीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर पथकासह सीपीआरमध्ये दाखल झाले. एका पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला, तर स्थानिक गुन्हे शाखेसह पाच वेगवेगळी पथके हल्लेखोराच्या मागावर पाठविण्यात आली आहेत.
दरम्यान, सानिकाची आई, बहीण, मैत्रिणी घटनेची माहिती मिळताच सीपीआरमध्ये दाखल झाल्या. सकाळीच घरातून बाहेर पडलेल्या सानिकाचा मृतदेह पाहण्याची वेळ आल्याने तिची आई, बहीण यांना मानसिक धक्का बसला. तिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संशयित सतीश यादव हा दोन वर्षांपासून शिवाजी पेठेत राहण्यास आला होता. येथे तो एका क्लबमध्ये काम करत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेले चार महिने सानिकासोबत तो 'लिव्ह इन'मध्ये राहिला खरा. पण, तिने यापुढे सोबत राहण्यास नकार देताच त्याच्याकडून सानिकाला त्रास देण्यास सुरुवात झाली. अखेर याच वादातून त्याने सानिकाला संपवले.

कुटुंबालाही आधार...
सानिकाच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. कसबा बावडा येथे तिची आई, बहीण, भाऊ राहतात. आई मासे विकून घर चालवत होती; तर सानिकाने गेल्या काही महिन्यांत इव्हेन्ट मॅनेजमेंटमध्ये जम बसवला होता. चार दिवासांपूर्वीच सतीशसोबत वाद झाल्याने ती घरी परतली होती. कुटुंबियांसोबत बोलताना आईला 'यापुढे मी घर चालवेन, तू काळजी करू नको' अशा विश्वासही दिल्याचे बहिणींनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.