Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून, पती दोन मुलांना घेऊन पसार

सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा  खून  करून, पती दोन मुलांना घेऊन पसार
 

सांगली : कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा डोक्यात बांबूने वार करून निघृण खून केला. गुरूवारी पहाटे हा प्रकार घडला. खुनानंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला. संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळवेढा परिसरात रवाना केले.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षापासून तो सांगलीत राहतो. गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होत. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील परंतू सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते. शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती. तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता. 
 
काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणांवरून सतत वाद होता. या वादास कंटाळून शिलवंती दि. १३ जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती पतीकडे परत आली होती. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती. शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते.



गुरूवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले. परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले, पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या.

नातेवाईकांचा आक्रोश
शिलवंती पाटील हीची आई, भाऊ तसेच हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना तिच्या खुनाची माहिती मिळताच ते दुपारी घटनास्थळी आले. त्यांनी शिलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला. शिलवंतीचा भाऊ आणि आई यांना तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याचे दिसून आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.