मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून सामाजिक भान जपत २ लाखांचा निधी सुपूर्त
बॅनरबाजीला फाटा देत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीस थेट मदत; पक्षशिस्तीचा आदर्श ठरला निर्णय
सांगली, दि. २२ जुलै २०२५ : भारतीय जनता पार्टीचे अभ्यासू, लोकनेते व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी एक वेगळी वाट चोखाळत समाजासाठी विधायक पाऊल उचलले आहे.आजच्या या विशेष दिवशी कोणतीही बॅनरबाजी, जाहिरातबाजी, प्रदर्शन वा डेकोरेशन टाळून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षशिस्तीचा आदर ठेवत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीस थेट रुपये दोन लाखांचा धनादेश सुपूर्त केला.
या माध्यमातून गरजूंना आरोग्यविषयक आपत्तीच्या काळात थेट मदत मिळू शकेल. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवरील उपचारांचा भार हलका करण्यासाठी ही आर्थिक मदत उपयुक्त ठरणार आहे.सामान्यपणे नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पोस्टर, फलकबाजी, रस्त्यांवर शुभेच्छांचे होर्डिंग्ज यांचा प्रघात असतो. मात्र आमदार गाडगीळ यांनी ह्या प्रथेला फाटा देत, ‘कार्यकर्त्यांनी व्यक्तिपूजेपेक्षा जनसेवा महत्त्वाची’ हीच पक्षाची खरी दिशा आहे, हे कृतीतून दाखवून दिले. “मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच विकासाभिमुख, शिस्तप्रिय, आणि लोकाभिमुख कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवशी गरजूंना मदतीचा हात देत दिवस साजरा करणे, हाच खरा सन्मान होय,” असे मत आमदार गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केले.आमदार गाडगीळ यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विकासकामे, निधीवाटप, सामाजिक उपक्रम या पलीकडे जाऊन निव्वळ बॅनर न लावता थेट वैद्यकीय निधीस मदत करणे ही गोष्ट अनेक लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः राजकारणात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेत्यांचा आदर्श हा अशा कृतीतूनच दिसून येतो, अशी प्रतिक्रिया भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमामुळे पक्षातील नवोदित कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एक सकारात्मक संदेश मिळाला आहे. “लोकशाहीत जनतेचा सेवक म्हणून वागा” या तत्त्वाला अनुसरून सामाजिक जाणिवा जपण्याचे आमदार गाडगीळ यांचे हे उदाहरण अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.