सांगली दि.२४: महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष मा. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची नुकत्याच हारुगेरी येथे झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनातील सर्वसाधारण सभेत द.भा.जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. त्याबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांच्या स्वदेशी व्हिला येथील दालनात संघाचे कार्याध्यक्ष व अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. आर. एस.चोपडे यांच्या हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला. तसेच सभेच्या संघटन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल संघाचे खजिनदार शशिकांत राजोबा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बी. जे. पाटील यांचे सुपुत्र युवराज यांना हायकोर्टात वकिलीची सनद मिळाली म्हणून रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, सेक्रेटरी विनोद पाटोळे, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी रावसाहेब पाटील म्हणाले, 'दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यात मी गेली २५ वर्षे कार्य करीत आहे. सभेची आर्थिक बाजू मजबूत करुन संस्थेचे संघटन व प्रशासन गतीमान केले. सभेच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरु केले. माझ्या जैन समाजासाठी केलेल्या कामाची नोंद शासनाने घेतली आणि महाराष्ट्र राज्य जैन समाज आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड केली. सार्वजनिक संस्थेचा जास्तीत जास्त लाभ समाज घटकांना व्हावा आणि शेवटचा घटक विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेतला पाहिजे ही माझी सार्वजनिक कामातील दृष्टी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि जिल्हा संघाच्या कामासाठी सतत काम करत राहिल्याने संस्थांचे अनेक प्रश्न सुटले. सांगलीत महामंडळाचे भव्य अधिवेशन घेऊन शासनाकडे प्रश्न मांडले. जिल्हा संघाचा सत्कार हा मला माझ्या घरचा सत्कार असून या सत्काराने मला दक्षिण भारत जैन सभा व खासगी शिक्षण संस्थांच्या प्रगतीसाठी अधिक कामाची जबाबदारी वाढली आहे असे मी मानतो. यावेळी नितीन खाडीलकर,वैभव गुरव, लगमाण्णा गडगे, नंदकुमार अंगडी भारत दुधाळ, प्रा. एम. एस. रजपूत,बी. जे. पाटील, दिग्विजय चव्हाण व संस्था संघाचे सदस्य उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.