सांगली : गुन्हेगारांचे वेळीच कंबरडे मोडा : कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी
सांगली, ता. २४ गुन्हे घडल्यानंतर तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हे उघडकीस आणले पाहिजे. परंतू गुन्हे घडू नये, यासाठी गुन्हेगारांवरं वचक निर्माण करा, वेळीच त्यांचे कंबरडेही मोडा, अशा सक्त सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिल्या. सांगलीत आगामी सण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी पोलिस दलाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, सर्व उपअधीक्षक यांची उपस्थिती होती.
यावेळी फुलारी यांनी जिल्ह्यातील जुने व नव्याने दाखल मालमत्ता आणि अन्य गुन्ह्यांचा आढावा घेतला. तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हे उघडकीस आणावेत, आरोपींवर वेळीच ठोस व परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करावी. 'व्हिजीबल पोलिसिंग' वाढवून गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. गणेशोत्सव, नागपंचमी, श्रावण मासातील सणाच्या पार्श्वभूमीवर उपविभाग आणि पोलिस ठाणे स्तरावर शांतता समिती, जातीय सलोखा समितीच्या बैठका घ्याव्यात, गणेशोत्सवापूर्वी 'एक गाव एक गणपती' ही योजना राबवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवावी, नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वनविभागासमवेत बैठक घ्यावी, श्रावणात अनेक ठिकाणी गर्दी होते, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी छेडछाड होऊ नये यासाठी छेडछाड विरोधी पथक व निर्भया पथक तैनात करावे, फुलारी यांनी जिल्हा कारागृहातून तसेच अन्य जिल्ह्यांतून कारागृहातून आरोपी बाहेर पडल्यानंतर संबंधित जिल्ह्यास त्याची माहिती उपलब्ध करून देणारी यंत्रणा स्थापन करावी, शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यांतून आरोपी जामिनावर मुक्त झाल्यानंतर त्याची माहिती संकलित करून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशा सूचना केल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.