मन सुन्न करणारी घटना... एकीकडं पावसाची सर, दुसरीकडं शेतकरी दाम्पत्यानं गळ्यात अडकवला दोर; गावकरीही शॉक
बुलढाणा : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला असून नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून शेतकरी आपलं जीवन संपवत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी विरोधकांकडून, शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. तर, दुसरीकडे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही आंदोलन सुरू केले असून ते मंत्रालयाकडे धाव घेत आहेत. अशातच बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारी शेतकरी आत्महत्येची घटना समोर आली आहे. शेतकरी दाम्पत्याने आपल्याच शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दु:खद घटना घडली.
चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी दांपत्याने शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती आणि पत्नीचे मृतदेह शेतातील झाडाला लटकल्याचं पाहून समाजमन सुन्न झालंय, तर गावावर शोककळा पसरलीय. येथील शेतकरी गणेश थुट्टे (वय 55 वर्षे) आणि पत्नी रंजना थुट्टे (वय 50 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याची नावे असून दोघांनी शेजारी-शेजारीच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतला. थुट्टे दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, त्यांच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, सातत्याने शेतीत होणारे नुकसान आणि हुमणी अळीने ते चिंतेत होते, त्यातचून आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गावपरिसरात होत आहे. दरम्यान, एकीकडे रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असतानाच ही घटना उघडकीस आल्यानंतर अंढेरा पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. मृतांचे पार्थिव खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.