Breaking News ! कऱ्हाड-पुणे, कोल्हापूर मार्गावर एकेरी वाहतूक; 15 ते
20 दिवस वाहनधारकांना सोसावा लागणार त्रास, 'हे' आहेत पर्यायी मार्ग
कऱ्हाड : पुणे-बंगळुरु महामार्गावरील कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानच्या उड्डाणपूल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलावर सेगमेंट बसवण्यासाठी त्याच्यावर गर्डर बसवण्यात आले आहेत. पुलाच्या सेगमेंटचे काम झाल्याने आता कोल्हापूर नाका आणि ढेबेवाडी फाटा येथील गर्डर खाली उतरण्याची कार्यवाही ठेकेदार कंपनीकडून आजपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यावरुन कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील कोयना पूल ते जखिणवाडी दरम्यान आणि कोल्हापूरहून पुण्याकडे जाताना जखिणवाडी ते कोयना पूल दरम्यान एकेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ती कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आल्याने त्यादरम्यान वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. पुणे-बंगळुरु महामार्गांतर्गत असलेल्या सातारा ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरण काम सुरु आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर नाक्यापासून नांदलापूरपर्यंत ३.४७ किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु आहे.उड्डाणपुलासाठी एकूण १२२३ सेगमेंट बसवण्याची कार्यवाही पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे सेगमेंट बसवण्यासाठीचे गर्डर काढण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या सेवा रस्त्यावरुन उड्डाणपुलाच्या खालून एकेरी वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी होऊन दोन्ही बाजूंची एकाच लाईनमधून वाहने नेताना वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा फटका महामार्गावरील सर्वच वाहनांना बसणार आहे.
कोल्हापूर नाका पुन्हा डेंजरझोन
महामार्गावरुन शहरात येण्यासाठी पुर्वीच्या उड्डाणपुलाखालून जो रस्ता होता, तेथूनच सध्या शहरात येण्यासाठी हलक्या वाहनांना मार्ग खुला करण्यात आला आहे. सातारा बाजूकडून येवून कोल्हापूरकडे जाणारी वाहने आणि कोल्हापूर बाजूकडून येवून कऱ्हाड शहरात येणारी वाहने एकाच मार्गावर येत असल्याने तो स्पॉट डेंजर झोनच ठरला आहे. साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी तेथे गतीरोधक करण्याची गरज आहे. सध्या दोन्ही मार्गावरील वाहने समोरासमोर येत असल्याने तेथेही वाहतूक जाम होत आहे.
वाहतूक पोलिसांच्या महामार्ग विभागाला सूचना
उड्डाण पुलावरील गर्डर कमीत कमी कालावधीत खाली उतरावे
वाहतूक जाम होणार असल्याने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या
एकेरी रस्ता सुरु करताना तो रस्ता सुस्थितीत करावा
उड्डाणपलाखालील रस्ते तातडीने सुरु करावे
उड्डाणपुलाखाली रस्ते झाल्याशिवाय नाल्यांचे काम सुरु करु नये
सेवा रस्त्याकडेची उघडी गटर तातडीने बंदिस्त करावी
पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवावे
जाणारी-येणाऱ्या रस्त्याच्या मोकळ्या जागेत बॅरिगेटींग करावे
नवीन नाल्यांवरील झाकणे तातडीने बसवण्यात यावी
कंपनीने उड्डाणपुलाखालील रस्ते सुरु केल्याशिवाय क्रेनचे काम सुरु करु नये
कामासाठी रस्ता वळवताना वाहतूक पोलिसांना त्याची माहिती द्यावी
वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित ठिकाणी वॉर्डन, मार्शल नेमावे
वाहन धारकांसाठी पोलिसांच्या सूचना
वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
ढेबेवाडी फाट्यावरील उड्डाणपुलाखाली दुचाकींचे पार्किंग करु नये
वाहनांची वेग मर्यादा कमी ठेवावी
कृष्णा हॉस्पिटल-ढेबेवाडी फाटा ते कोयना पुलापर्यंत वाहनांचे पार्किंग करु नये
वाहनधारकांनी वाहतुकीची शिस्त पाळावी
दुचाकीस्वारांनी अवजड वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवून वाहने चालवावी.
चारचाकी वाहनांसाठी 'हे' आहेत पर्यायी मार्ग
पुण्याकडून कोल्हापूरकडे जाताना कोल्हापूर नाक्याकडे न जाता महामार्गावरील अन्नपूर्णा हॉटेलजवळून सेवा रस्त्याने जुन्या कोयना पुलावरुन कऱ्हाड शहरातील भैदा चौकातून मार्केट यार्ड मार्गे मलकापूरवरुन नांदलापूर फाट्यावरुन महामार्गाला जाता येते. कोल्हापूरकडून पुण्याकडे जाताना नांदलापूर फाट्यापासून मलकापूर, मार्केट यार्ड, भेदा चौकातून पुन्हा पोपटभाई पेट्रोल पंपासमोरुन जुन्या कोयना पुलावरुन पाटण तिकाण्यातून महामार्गावर जाता येते. विटा, खानापूर, आटपाडीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना उंब्रजपासून मसूर फाट्यावरुन मसूरवरुन, सह्याद्री कारखान्यासमोरुन कोपर्डे हवेली मार्गे कृष्णा कॅनॉल येथून विटा रस्त्याला जाता येते.कोल्हापूर नाका आणि ढेबेवाडी फाटा येथील उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवण्यासाठी गर्डर उभे करण्यात आले आहेत. ते क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी रस्ता उपलब्ध असेल. त्यामुळे रस्ता अरूंद होवून वाहतूक जाम होणार आहे. त्याचा विचार करुन ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलाखालील रस्ता सुरु केल्याशिवाय ते काम सुरु करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. वाहधारकांनी कोणतीही घाईगडबड न करता वाहनधारकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करुन आपली जबाबदारी ओळखून वाहने चालवावी.-संदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा, कऱ्हाड
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.