श्वानदंश झाल्यानंतर उपचाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्वानदंश झाल्यानंतर या तरुणाने कुटुंबालाही याबाबत काहीच माहिती दिली नव्हती. त्यामुळे तरुणाची तब्येत बिघडल्यानंतर
कुणाला काहीच कळत नव्हतं. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला
जबर धक्का बसला आहे. अमन कोरी असे मृत तरुणाचे नाव असून तो अंबरनाथ
पश्चिमेला पटेल प्रेस्टिज सोसायटी येथे कुटुंबासोबत राहत होता. मिळालेल्या
माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी अमनला कुत्रा चावला होता. त्यावेळी त्याने
फक्त एक इंजेक्शन घेतले. मात्र उपचार पूर्ण केले नाहीत. तसेच श्वानदंश
झाल्याची माहिती त्याने कुटुंबापासून लपवली होती, अशी माहिती समोर आली आहे.
श्वानदंश झाल्यानंतर अमनच्या पायाचा आकार लहान होत असल्याचे कुटुंबाच्या
लक्षात आले. मात्र श्वानदंश झाल्याची कल्पना नसल्याने अमनच्या पायाला
अर्धांगवायू (लकवा) झाला असल्याचा अंदाज कुटुंबीयांना होता. त्यामुळे
कुटुंबातील सदस्यांनी हैदराबाद येथे आयुर्वेदिक उपचारासाठी त्याला नेले
होते. मात्र काही दिवसांनी अमनचे हावभाव कुत्र्याप्रमाणे जाणवू लागले.
त्यामुळे त्याला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
होते.
वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला रेबीज झाल्याचे लक्षात आले. याबाबत कुटुंबातील सदस्यांनी त्याला विचारले असता आपल्याला दीड ते दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावला असल्याचे त्याने सांगितले. ही बाब ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला. मात्र उपचाराची योग्य वेळ निघून गेल्याने दुर्दैवाने कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान अमनचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून श्वानदंश झाल्यास वेळेवर पूर्ण उपचार घेणे आवश्यक असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.