घरात लहान मुलं असतील तर पालक प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करतात. त्यांना काय खायला द्यायचं, कुठे फिरायला न्यायचं, नाही न्यायचं यामागे कारणे असतात. पण एखाद्या कफ सिरपमुळे मुलं दगावली तर? असा एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय. ज्यामुळे मुलांसाठी कफ सिरप निवडतानादेखील पालकांना काळजीपूर्वक निवडावी लागेल. काय नेमका प्रकार? जाणून घेऊया.
कोयलांचल परिसरात गेल्या 10 दिवसांपासून मुलांच्या मृत्यूच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे की, सर्दी-खांसीसाठी दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमुळे मुलांच्या किडनी निकामी झाल्या. आतापर्यंत 6 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला असून, अनेक मुले नागपूर आणि छिंदवाडा येथील रुग्णालयांत दाखल आहेत. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने पावले उचलत दोन कफ सिरपवर बंदी घातली आहे.
मुलांमध्ये दिसू लागली लक्षणे
20 सप्टेंबरपासून परासिया, उमरेठ, जाटाछापर, बडकुही परिसरात मुलांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे दिसू लागली. स्थानिक डॉक्टर आणि मेडिकल दुकानांमधून घेतलेल्या कफ सिरपमुळे मुलांची प्रकृती खालावली. काही दिवसांतच मुलांचे मूत्रप्रवाह बंद झाले, आणि गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
कलेक्टर काय म्हणाले?
छिंदवाडा कलेक्टर शीलेंद्र सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरपमधील डायएथिलीन ग्लायकॉल हे रसायन कारणीभूत असल्याची शक्यता आहे. यामुळे कोल्ड्रिफ आणि नेक्सट्रॉस डीएस या दोन कफ सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
बायोप्सीतून काय आलं समोर?
तपासात मुलांच्या मृत्यूचे कारण साथरोग किंवा विषाणू नाही, तर कफ सिरपमुळे किडनी खराब झाल्याचे स्पष्ट झाले. पुणे व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट, आयसीएमआर दिल्ली आणि भोपाळच्या तपासात कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूंची पुष्टी झाली नाही. बायोप्सी अहवालात औषधांमुळे किडनीवर परिणाम झाल्याचे संकेत मिळाले.
प्रशासनाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
रविवारी रात्री कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ड्रग इन्स्पेक्टर यांनी चर्चा करून दोषी कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
प्रशासनाची सूचना
प्रशासनाने पालक, डॉक्टर आणि मेडिकल दुकानदारांना बंदी घातलेल्या सिरपचा वापर किंवा विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. मुलांचा उपचार केवळ सरकारी रुग्णालयात करावा, असे सांगण्यात आले आहे.उमरेठ, बडकुही, जाटाछापर गावांमध्ये मुलांच्या मृत्यूमुळे भीती आणि शोक पसरला आहे. प्रशासनाने गावागावांत पत्रके वाटून जनजागृती सुरू केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.