दिल्लीला विमानाने जायचे अन् येताना चोरीच्या चारचाकीतून यायचे!
नंबरप्लेट, चेसी व इंजिन नंबर बदलून स्वस्तात विकायचे अलिशान गाड्या,
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
सोलापूर : पुणे, मुंबई, बंगळुरू येथून विमानाने दिल्लीला जायचे आणि तेथील हफिज (रा. मेरठ, दिल्ली) आणि लखविंदर सिंग (रा. रायपूर) यांच्याकडून चोरीची महागडी वाहने महाराष्ट्रात आणून स्वस्तात विकणाऱ्या चौघांना ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. चौघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची बाब तपासात समोर आली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भिमनगोंडा पाटील यांचे पथक मुळेगाव तांडा हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सोलापूर-हैदराबाद रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रोडजवळ एक फॉर्च्युनर उभी होती. त्या गाडीचा क्रमांक एमएच ४५, एडब्ल्यू ५५७७ असा होता. गाडीत चौघे होते. त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली, त्यावेळी त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी गाडी कोणाच्या नावावर आहे हे पडताळले. मूळ मालकाशी संपर्क साधला, त्यावेळी त्या क्रमांकाचे वाहन मूळ मालकाकडे होते. त्यावेळी हा बनावट क्रमांक असल्याचे लक्षात आले. गाडीचा चेसी व इंजिन क्रमांक पाहिला असता त्यात छेडछाड केल्याचे दिसले. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन तालुका पोलिस ठाण्यात आणले. अजीम सलीमखान पठाण, प्रमोद सुनील वायदंडे (दोघेही रा. रहिमतपूर, कोरेगाव, जि. सातारा), फिरोज शिराज मोहम्मद (रा. बंगळुरू, कर्नाटक) व इर्शाद सफिउल्ला सय्यद (रा. कोलार, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पाटील, विशाल वायकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक निलकंठ जाधवर यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली. संशयित आरोपी अजीम पठाण व हफिज यांच्यावर पूर्वी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पिंपरी चिंचवड, कर्नाटकातील आरसीकेआर पोलिस ठाण्यात आणि दिल्लीतील मुखर्जी नगर, हरी नगर, मोर्या, राणीबाग, शाकरपूर, बिसरस, मॉडेल टाऊन, सुभाष प्लेस पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. इलियास देखील सराईत गुन्हेगार आहे.
चोरीच्या कारला दुसरीच नंबरप्लेट
गाडीचा मूळ इंजिन व चेसी क्रमांक काढून गाडीच्या मॉडेलनुसार बनावट इंजिन व चेसी क्रमांक ते बसवत होते. त्यावरून ते बनावट आरटीओ रजिस्टर स्मार्ट कार्ड तयार करून त्या गाड्यांची विक्री करत होते. चोरीची फॉर्च्युनर विकायला ते सोलापुरात आले होते. पोलिसांनी चौघांकडून एक फॉर्च्युनर, तीन क्रेटा व एक ब्रिझा अशा पाच कार व मोबाइल, असा एकूण ८३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.