भाजपाच्या कार्यालयातून काम करा; बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन आता चांगलंचं तापलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटीनंतर बच्चू कडू गुरुवारी (30 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
मात्र तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचे म्हणजे आंदोलन सुरू असताना भेटीसाठी आलेल्या नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी झापल्याचं पाहायला मिळालं.
संध्याकाळनंतर बच्चू कडू यांच्या महाएल्गार आंदोलनाने आक्रमक रुप धारण केलं आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे आंदोलनावेळी बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहचले. तेव्हा बच्चू कडू म्हणाले की, तुम्हाला आज वेळ मिळाला का? आम्ही इतके दिवस आंदोलन करत आहोत, आमची एकदा तरी भेट घ्यावी, असं तुम्हाला वाटलं नाही का? बच्चू कडूंच्या या प्रश्नांवर डॉ, विपीन इटनकर म्हणाले की, मी तुमच्या संपर्कात होतो. मात्र बच्चू कडू पुन्हा संतापले.
बच्चू कडू म्हणाले की, तुम्ही कुठे संपर्कात होतात? आम्हाला मूर्ख बनवत आहात का? तुम्ही जिल्हाधिकारी आहात? कायदा सुव्यवस्था राखणे तुमची जबाबदारी आहे. परंतु संपूर्ण आंदोलनादरम्यान तुमचा एकही फोन आला नाही. तुम्ही स्वत:ला काय समजता? असा प्रश्न उपस्थित करतानाच बच्चू कडू म्हणाले की, आम्ही इतके दिवस आंदोलनाला बसलो होतो आणि तुमचा एसपी भाजपाचा झेंडा घेऊन फिरत आहे. तुम्ही भाजपाच्या कार्यालयातून काम करा, अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.
महाएल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर रेल्वेरोको करू, असा इशारा आज सकाळी बच्चू कडू यांनी दिला होता. त्यामुळे सरकारच्या शिष्टमंडळातून मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल हे आज दुपारी 4 वाजता बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याचे ठरले. मात्र सरकारचं शिष्टमंडळ पोहचलं नाही आणि दुसरीकडे नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले. तसेच 6 वाजण्यापूर्वी पोलिसांनी देखील बच्चू कडू यांना नोटीस दिली. मात्र बच्चू कडू यांनी पोलिसांना परत पाठवून दिले. त्यानंतर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडू, इतर नेते आणि आंदोलनकर्ते स्वत:ला अटक करून घेण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघाले. आंदोलन आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्या भेटीला पोहचले. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उद्या सकाळी बच्चू कडू देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. मात्र तोपर्यंत बच्चू कडू यांचं आंदोलन महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर शिफ्ट होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.