सांगली, ता. ७ : काँग्रेसच्या शहर-जिल्हाध्यक्षपदाची निवड पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. महापालिकेची निवडणूक पंधरा दिवसांत जाहीर होईल, असे संकेत मिळत असताना काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यात एकमत होताना दिसत नाही. माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व राजेश नाईक यांच्यात स्पर्धा लागली आहे. आता दोन्ही नेत्यांना राजेश नाईक की मंगेश चव्हाण, हे आठवडाभरात ठरवावे लागणार आहे.
ज्येष्ठ नेते पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त शहर-झाले. या पदावर ज्येष्ठ माजी नगरसेवकाला संधी दिली जाईल, असे संकेत आमदार विश्वजित कदम यांनी दिले. मंगेश चव्हाण, राजेश नाईक,अय्याज नायकवडी, संजय मेंढे अशा नावांची चर्चा होती. कोणाचीही निवड करा, मात्र लवकर करा, अशी मागणी इच्छुकांनी दोन महिन्यांपूर्वी केली. त्यातून प्रदेश काँग्रेसचे राजेश नाईक आणि मंगेश चव्हाण या दोघांची नावे पाठवल्याची माहिती आहे. खासदार विशाल पाटील यांचे मत नाईक यांच्या पारड्यात आहे. विश्वजित कदम यांची भूमिका अस्पष्ट असली, तरी मंगेश चव्हाण हे त्यांचे थेट समर्थक मानले जात असल्याने त्याबाबतही चर्चा होते आहे. त्यामुळे निर्णय लांबला आहे, असेही सांगण्यात येत आहे.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. त्या नावांच्या आधारे पक्ष थेट सर्वेक्षण लावणार आहे. दुसरीकडे काँग्रेसला अजून अध्यक्ष मिळत नसल्याने इच्छुकांतही संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. या आठवड्यात या निवडीचा निर्णय घ्यावा लागेल, अशी कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका मांडली आहे. आमदार कदम यांच्याकडून काय संकेत येतात, याकडे आता लक्ष असणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.