रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राच्या कार्यक्रमात भारताच्या प्रगतीच्या आलेखाबाबत महत्त्वाचे भाष्य केले. “पुढील १० वर्षांत देशातून गुलामीची मानसिकता पूर्णपणे काढून टाकायला हवी. ही मानसिकता देशाच्या विकास प्रवासातील सर्वात मोठा अडथळा आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या कार्यक्रमात त्यांनी तथाकथित बुद्धिजीवी लोकांवर टीका केली.
भारताच्या बँकांमध्ये ७८ हजार कोटी रुपये बेवारस पडून
या कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाच्या विविध बँकांमध्ये भारतीय नागरिकांचे ७८ हजार कोटी रुपये पडून आहेत. या पैशांवर कुणीही दावा केलेला नाही. याचप्रकारे आयुर्विमा कंपन्यांकडे १४ हजार कोटी रुपये पडून आहेत. म्युच्युअल फंड कंपन्यांकडे जवळपास ३ हजार कोटी रुपये आणि डिव्हिडंडचे ९ हजार कोटी रुपये पडून आहेत. या पैशांना विचारणारे कुणीही नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “हा पैसा गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबाचा आहे. हे ज्याचे पैसे आहेत, तो तर विसरला आहे. आमचे सरकार आता त्यांना शोधत आहे. हा पैसा कोण सोडून गेले, याचा शोध घेतला जात आहे. आमचे सरकार या पैशांच्या वारसदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने विशेष शिबिरेही आयोजित केले आहेत.”“आतापर्यंत ५०० जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून हजारो कोटी रुपये मूळ वारसदारांना परत केले आहेत. पैसे तर पडूनच होते, त्यांना विचारणारे कुणी नव्हते. पण मोदी असे पैसे पडू देणार नाही. मी म्हणतोय, तुमचे पैसे आहेत, घेऊन जा. हा फक्त संपत्ती परत करण्याचा विषय नाही. तर हा विश्वासाचा मुद्दा आहे. जनतेचा विश्वास हेच आपले मोठे भांडवल आहे. गुलामीची मानसिकता असती तर सरकारी माणूस असे अभियान कधीच राबवू शकला नसता”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, २१ व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग संपला आहे. या काळात जगात अनेक उलथापालथी झाल्या. साथीच्या रोगांपासून ते युद्धापर्यंत, मोठे तांत्रिक घोळ होण्यापासून ते जगात अनिश्चितता आणि सतत बदल यासारख्या घडामोडी घडल्या. तरीही या अस्थिरतेच्या काळात भारताने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. भारता अधिक ताकदीने आणि आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग तयार करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.