लिव्ह-इन पार्टनरमध्ये वाद उद्भवल्यानंतर त्यांची थेट हत्या करण्याची अनेक प्रकरणे देशभरात विविध ठिकाणी घडली आहेत. आता लखनऊमध्ये असेच एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. एका ४६ वर्षीय महिलेने तिच्या ३५ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. या खुनात महिलेला तिच्या १७ आणि १४ वर्षीय मुलीनींही मदत केली. बीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लखनऊ ग्रीन सीटी परिसरात सदर घटना घडली. आरोपी महिलेने तिच्या दोन मुलींच्या साथीने लिव्ह-इन पार्टनरची गळा चिरून हत्या केली. महिलेचा आरोप आहे की, तिच्या मोठ्या मुलीवर मृत व्यक्ती वाईट नजर टाकत होता. यावरून त्यांच्यात वाद झाला. ज्यानंतर महिलेने त्याला संपवले.
पोलिसांनी सांगितले की, तरूणाचा खून केल्यानंतर आरोपी महिला आपल्या मुलींसह तिथेच दहा तास थांबून होती. तिनेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून याची माहिती देत गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळे पोहोचले, तेव्हा मृत तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मृत तरूण इंजिनिअर असून त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून लिव्ह-इन पार्टनर असलेला तरूण तिच्या मोठ्या मुलीवर डोळा ठेवून होता. काही दिवसांपूर्वी त्याने मुलीचा विनयभंगही केला होता. ज्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले होते.रविवारी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर महिलेने तिच्या दोन मुलींच्या मदतीने स्वयंपाक घरातील सुऱ्याने लिव्ह-इन पार्टनरचा गळा चिरला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून खुनासाठी वापरलेला सुरा ताब्यात घेतला. मृत तरूण मुळचा देवरिया जिल्ह्यातील आहे. एका खासगी कंपनीत तो कार्यकारी अभियंता म्हणून काम करत होता. २०१२ साली तो आरोपी महिलेच्या मुलींना शिकवणी देण्याचे काम करत होता. त्यानंतर त्याने महिलेच्या घराजवळच भाड्याने घर घेतले होते. महिलेच्या पतीचे २०१४ मध्ये निधन झाले. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. या नात्याला दोघांच्याही कुटुंबाने विरोध केला होता. तरीही त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.मृत तरूणाच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी महिला आणि तिच्या दोन मुली माझ्या मुलाचा आर्थिक छळ करत होते. पोलीस उपायुक्त शशांक सिंह यांनी सांगितले की, आरोपी महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तर मुलींनाही ताब्यात घेतलेले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.