प्रतीक्षा अखेर संपली! Elon Musk यांची 'Starlink Internet' सेवा भारतात सुरू; प्लॅनची किंमत कितीपासून?
प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांची सॅटेलाइटवर आधारित इंटरनेट सेवा स्टारलिंक जगभरात लोकप्रिय आहे. भारतात ही सेवा कधी उपलब्ध होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आता भारतातही स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. मात्र, अनेकांना वाटल्याप्रमाणे ही सेवा स्वस्त नाही, तर किंमतींनी ग्राहकांना थोडं आश्चर्यच दिलं आहे. स्टारलिंक इंडियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, देशात उपलब्ध होणारे स्टारलिंकचे इंटरनेट प्लॅन्स 8,600 रुपयांपासून सुरू होतात. एवढ्यावरच थांबत नाही, तर सेवा वापरण्यासाठी लागणाऱ्या हार्डवेअर किटसाठी तब्बल 24,000 रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील. त्यामुळे पहिल्याच महिन्यातील खर्च साधारणपणे खूप मोठा असणार आहे.
स्वतः सेटअप करण्याची सुविधा
स्टारलिंकचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे इंस्टॉलेशन. कंपनीचा दावा आहे की युजर कोणत्याही अतिरिक्त तांत्रिक मदतीशिवाय स्वतःच हार्डवेअर सेटअप करू शकतो. बॉक्समध्ये दिलेल्या सूचनांनुसार उपकरण बसवल्यानंतर काही मिनिटांत इंटरनेट सेवा सुरू होते. याशिवाय, कंपनीने 30 दिवसांचा ट्रायल पिरियड दिला आहे, ज्यात यूजर्स सेवा तपासून पाहू शकतात.
अपटाईम आणि स्टेबिलिटीचा मोठा दावा
स्टारलिंकचा दावा आहे की त्यांची सेवा 99.9 टक्के अपटाईम देते, म्हणजे इंटरनेट जवळपास कधीही खंडित होत नाही. सिग्नलची स्टेबिलिटीदेखील अत्यंत मजबूत असल्याचा कंपनीचा आग्रह आहे. उपग्रहांच्या माध्यमातून सिग्नल पुरविला जात असल्याने, ही सेवा भारतातील कोणत्याही दुर्गम भागातूनदेखील मिळू शकते. पर्वतीय प्रदेश, जंगल परिसर किंवा नेटवर्कहीन गावांमध्येही इंटरनेट पोहोचवण्याची ताकद या सेवेतील असल्याचे कंपनी सांगते. मात्र सध्या स्टारलिंकची सेवा मर्यादित भागातच कार्यरत आहे आणि टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येत आहे.
ट्रायलमध्ये मिळणार अनलिमिटेड डेटा
30 दिवसांच्या ट्रायल दरम्यान ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट डेटा दिला जाणार आहे. युजर्स स्टारलिंकच्या वेबसाइटवर जाऊन आपल्यासाठी उपलब्ध असलेले प्लॅन्स, किंमती आणि लोकेशननुसार मिळणाऱ्या ऑफर्स तपासू शकतात. प्रत्येक प्रदेशासाठी किंमतींमध्ये आणि सेवा अटींमध्ये काहीसा फरक दिसू शकतो.
घरगुती वापरासाठी सेवा; Roam प्लॅनही उपलब्ध
सध्या स्टारलिंकने भारतात घरोघरी इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय कंपनीकडे Starlink Roam नावाचा प्लॅनदेखील आहे. या प्लॅनअंतर्गत यूजर आपला स्टारलिंक अँटिना किट कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि प्रवासातही इंटरनेटचा वापर करू शकतो. पर्वत, कॅम्पिंग किंवा दुर्गम भागात जाणाऱ्या लोकांसाठी हा प्लॅन विशेष उपयुक्त ठरू शकतो.एकूणच, स्टारलिंकच्या प्रवेशामुळे भारतातील इंटरनेट अनुभवात मोठे बदल घडू शकतात. किंमत जरी जास्त असली तरी ग्रामीण आणि नेटवर्कविहीन भागात वेगवान इंटरनेट मिळवण्याची ही एक क्रांतिकारी संधी असल्याचे मानले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.