Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वासरांमधील लम्पी स्कीन डिसीज टाळण्यासाठी पशुपालकांनी वासरु व्यवस्थापनात- खबरदारी घ्यावी

वासरांमधील  लम्पी स्कीन डिसीज टाळण्यासाठी पशुपालकांनी वासरु व्यवस्थापनात - खबरदारी घ्यावी


सांगली  दि. 21- गायींच्या वासरांमध्ये लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव व मरतूक वाढताना दिसत आहे. त्यामुळे वासरांमध्ये रोग प्रतिकारशक्ती अधिक राहण्यासाठी वासरांचे आहार व निवारा व्यवस्थापन,जैवसुरक्षा,जंत निर्मूलन, बाह्यपरजीवी नियंत्रण व लसीकरण या बाबींवर पशुपालकांनी  आवश्यक खबरदारी घेऊन वासरु व्यवस्थापनास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी केले आहे.

वासरांचे व्यवस्थापन करताना पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

१) नवजात वासरांना जन्मल्यानंतर दोन तासांच्या आत वजनाच्या १०% प्रमाणात चीक पाजण्यात यावा, जेणेकरून चीकाद्वारे नवजात वासरांना उत्तम रोगप्रतिकारक  शक्ती निर्माण होईल.

२) कोणत्याही परिस्थितीत नवजात वासरांची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे वजनाच्या १०% दूध वासरांना नियमितपणे पाजण्यात यावे.आहारात प्रथिनयुक्त अशा द्विदल चाऱ्याचा समावेश करावा.

३)  वासरांना खुराक/काफ स्टार्टर रेशन वयाच्या चौथ्या आठवडयापासून देण्यात यावे. 

४) वासरांना सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ ठेवावे जेणेकरून आवश्यक प्रमाणात ड जीवनसत्वामध्ये वाढ होऊन वासरांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

५) अति थंड  किंवा अति ओलावा इत्यादी वातावरणातील बदलांमुळे वासरांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. म्हणून नवजात व लहान वासरांचे  प्रतिकूल वातावरणापासून संरक्षण करण्यात यावे. 

६) नवजात वासरांना उबदार व पुरेसा हवेशीर निवारा उपलब्ध करून द्यावा.हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी नवजात वासरांना उबदार ठिकाणी ठेवण्यात यावे.थंडी जास्त असल्यास वासरांच्या शरीराचा भागही उबदार कपड्यांनी झाकून ठेवावा व वासरांचे थंडीपासून संरक्षण करण्यात यावे.

७)  वासरांची बसण्याची जागा किंवा अंगावर टाकलेले कपडे ओलसर होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी.

८) वासरांना मोठया जनावरांपासून वेगळे ठेवण्यात यावे जेणेकरून लम्पी रोगाचे होणारे संक्रमण टाळता येईल.

९) गोठयामध्ये पडणारी रोगी वासरांची लाळ,नाकातील स्त्राव याचे दररोज २ % सोडीयम हायपोकलोराईट  द्रावण किंवा ३% फिनाईल द्रावण वापरून निर्जंतुकीकरण करावे.तसेच फवारणीनंतर अर्धा तास वासरांना गोठयामध्ये जाऊ देवू नये.

१०)  नवजात वासरांमध्ये जंतांचा  प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अशी वासरे लम्पी चर्मरोगासारख्या आजारांना बळी पडतात. म्हणून नवजात वासरांचे जन्मल्यानंतर सातव्या व त्यानंतर २१ दिवसानी जंतनिर्मूलन करून घ्यावे.

११)  वासरांचा / जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा व गोचिड/गोमाशा प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी.यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिली निंबोळी तेल,१० मिली करंज तेल,१० मिली निलगिरी तेल व २ ग्राम अंगाचा साबण मिसळून द्रावण तयार करावे. 

१२) कोणत्याही परिस्थितीत परिसरात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरून कीटकांची उत्पत्ती रोखता येईल.

१३) ज्या ठिकाणी शेण साठवले जाते ती जागा पॉलिथीन कागदाने झाकून ठेवावी.

१४) सर्व वयोगटातील वासरांचे लम्पी चर्मरोगाचे प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.