263 कोटी रूपयांचा टीडीएस गैरव्यवहार; माजी प्राप्तिकर अधिकाऱ्यांसह 3 जणांना अटक
मुंबई : २६३ कोटी रुपयांच्या टीडीएस गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी वरिष्ठ कर सहाय्यक तानाजी मंडल अधिकारी, त्यांचे साथीदार भूषण पाटील व राजेश शेट्टी यांना शुक्रवारी अटक केली. अधिकारी मुंबईतील प्राप्तीकर विभागात कार्यरत असताना हा गैरव्यवहार झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने यापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकमधील ३२ स्थावर आणि जंगम मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यांची किंमत ६९ कोटी ६५ लाख रुपये आहे. याप्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या रकमेचा माग ईडी काढत आहे. २००७-०८ आणि २००८-०९ च्या मूल्यांकन वर्षांसाठी बनावट परतावा जारी केल्याप्रकरणी अतिरिक्त महासंचालक (दक्षता)-४ सीबीडीटी यांनी तक्रारी केली होती. त्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत अधिक तपास करीत आहे. वरिष्ठ कर सहाय्यक म्हणून काम करीत असताना अधिकारी यांना 'आरएसए टोकन्स' आणि 'लॉगिन क्रेडेंशियल्स'मध्ये प्रवेश करण्याचा अधिकार होता. त्यावेळी त्यांनी संगनमताने एकूण २६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त टीडीएस परतावा देऊन तो विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करून फसवणूक केली, असे आरोप आहेत.
त्यात मेसर्स एसबी एंटरप्रायझेसच्या बँक खात्याचाही समावेश आहे. ती कंपनी आरोपी भूषण अनंत पाटील यांच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी आरोपी तानाजी अधिकारी, भूषण पाटील, राजेश शेट्टी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने केलेल्या तपासानुसार, १५ नोव्हेंबर २०१९ ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत अधिकारी यांनी एकूण १२ बनावट टीडीएस परताव्याद्वारे २६३ कोटी ९५ लाख ३१ हजार ८७० रुपयांचा गैरव्यवहार केला. ती रक्कम भूषण पाटील याच्या मालकीच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली. ती रक्कम पुढे भूषण पाटील व इतर संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये, तसेच बनावट कंपन्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.