टोमॅटो विकून 30 लाख कमवणाऱ्या शेतकऱ्याची हत्या
सध्या बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 150 ते 160 रुपये मोजावे लागत असल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. दरम्यान टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे आंध्र प्रदेशमधील एक शेतकऱ्याने तब्बल महिनाभरात 30 लाख कमावले. मात्र त्याची हीच कमाई त्याच्या जीवावर बेतली आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञातांनी त्या शेतकऱ्याची गळा घोटून हत्या केली. नारेम चंद्रशेखर रेड्डी असे त्या शेतकऱ्याचे नाव असून बुधवारी त्याची हत्या करण्यात आली.
नारेम चंद्रशेखऱ रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील अन्नमाय्या जिल्ह्यातील बोडीमालाडीन्ने गावात राहायचे. त्यांची टोमॅटोची शेती होती. यावर्षी जुलै महिन्यात टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेड्डी यांना भरपूर नफा मिळाला होता. त्यांनी महिनाभरात तब्बल 30 लाख रुपये कमावले होते. बुधवारी रेड्डी हे पहाटे गावात दुधाची डिलिव्हरी करायला गेलेले असताना त्यांची गळा घोटून हत्या करण्यात आली. गावातील एका निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचे हात पाय दोरीने बांधून टॉवेलने त्यांचा गळा आवळण्यात आलेला होता. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
