मणिपूर घटनेतील सहाव्या आरोपीला अटक; अन्य आरोपींचा शोध सुरू
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मणिपूर घटनेत आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 20 जुलै रोजी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. मणिपूर पोलिसांनी ट्विट करून दावा केला आहे की, उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. याबाबत आम्ही सातत्याने पोलीस छापे टाकत आहोत.
एका वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, पाचव्या आरोपीची ओळख 19 वर्षीय तरुण आहे. मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना शुक्रवारी (21 जुलै) 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर काही तासांनी त्याचे घर जमावाने पेटवून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये मुख्य आरोपी कांगपोकपी जिल्ह्यातील बी फेनोम गावात जमावाला भडकवताना दिसला.
ज्या दोन महिलांबरोबर ही लाजिरवाणी घटना घडली त्यापैकी एक भारतीय लष्कराच्या एका माजी सैनिकाची पत्नी आहे. त्यांनी आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून काम केले होते आणि कारगिल युद्धातही भाग घेतला होता. या घटनेशी संबंधित व्हिडीओबाबत 21 जून रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील सैकुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
