सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ : एनडीआरएफच्या टिमकडून नदी पात्राची पाहणी
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततदार सुरू असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. यासाठी एनडीआरएफ च्या 22 जणांची एक तुकडी पाच बोटीसह सांगलीत कृष्णा नदीवर दाखल झाली आहे.
एनडीआरएफ च्या टीमने आज नदीपात्रामध्ये बोटीच्या सहाय्याने पाहणी करत महापालिका अग्निशमन विभागाच्या मदतीने माहिती जाणून घेतली. यावेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती या पथकाला दिली. सांगली शहर परिसरामध्ये अद्याप पूरस्थिती नसली तरी खबरदारीच्या उपाय म्हणून एनडीआरएफ अगोदरच दाखल झाले आहे. 30 ऑगस्टपर्यंत एनडीआरएफ ची टीम सांगलीमध्ये राहणार आहे अशी माहिती एनडीआरएफ कडून देण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

