लोकसभेसाठी मास्टर प्लॅन; मंत्री पदाचा राजीनामा देऊन ' हा' बडा नेता निवडणूक लढविणार? कन्येला ही मिळणार संधी !
बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अचानक 'यू टर्न' घेऊन लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. उमेदवारी निवड आणि लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात हालचालींना वेग आलेला असताना जारकीहोळी यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यामुळे पक्षातील इच्छुकांना एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.
जारकीहोळी यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा गेल्या महिन्यांत केली होती. मात्र, शनिवारी अचानक निवडणूक लढवण्याची तयारी दाखविली आहे. पक्षाकडून निवडणूक लढविण्याचे आदेश मिळाल्यास लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगत पालकमंत्री जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी यादीत 'एंट्री' घेतल्यामुळे अनेकांची 'विकेट' उडणार असल्याचे मानले जात आहे.याशिवाय मागील सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केलेल्यांना 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारी ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बैठकही घेण्यात आली. या बैठकीमध्ये लोकसभेची जबाबदारी पालकमंत्री आणि मंत्र्यांवर सोपविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.या बैठकीनंतर सतीश जारकीहोळी यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस १३५ जागा जिंकून राज्यात सत्तेवर आला आहे. तसेच, १५ पेक्षा अधिक जागा जिंकताना वर्चस्व निर्माण करण्याचेही आव्हान आहे. त्यामुळे आखाड्यामध्ये तगडा उमेदवार उतरविण्याची तयारी काँग्रेसतर्फे सुरू आहे. जारकीहोळींनी २०१९ मध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढविली होती.
त्यामध्ये दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगल अंगडी यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत जारकीहोळी यांचा निसटता पराभव झाला. भाजपला सतत विजय मिळत असल्यामुळे बेळगाव भाजपचा बालेकिल्ला ठरला. त्यामुळे मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार मंगल अंगडी यांचा पराभव करावयाचा झाल्यास तितक्याच ताकदीचा व तगडा उमेदवार रिंगणात राहणे अपेक्षित आहे. यामुळे जारकीहोळी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
...तर 'यमकनमर्डी'त पोटनिवडणूक शक्य
पालकमंत्री जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळविल्यास यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. तेथून त्यांच्या कन्येला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत सतीश जारकीहोळींनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यामुळे बेळगाव मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.