आता चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थ होणार स्वस्त; जीएसटी दरात कपात
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) परिषदेच्या 50 व्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांकडून चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थांवर जीएसटी कमी आकारावा लागणार आहे. हा कर 18 वरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थ आता स्वस्त होणार आहेत.
यासोबतच जीएसटी ट्रिब्युनल स्थापन करण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. ट्रिब्युनल स्थापन करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळेल. जीएसटीसंदर्भातील विवादांच्या निपटार्यासाठी ट्रिब्युनलची मागणी काही राज्यांकडून करण्यात आली होती. मात्र ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर 28% कर आकारला जाणार आहे.
कर्करोगावरील उपचारासाठी आयातीवरील औषधावरही आता जीएसटी न लावण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, परिषदेने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या डिनुटक्सिमॅब औषध आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्या विशेष औषधी अन्न उत्पादनच्या आयातीवर जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. तर वाहन उद्योगाला दिलासा देताना एसयूव्ही श्रेणीतील सेडान गाड्यांवर 22 टक्के अधिभार आकारला जाणार नसल्याचेही अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
