कृषिसेवक भरतीमुळे योजना शेतकऱ्यांना बांधावर! 2109 पदांची भरती जाहीर
शेतकऱ्यांचा सल्लागार आणि शेतकरीमित्र असलेल्या कृषिसेवकामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, सल्ला अन् पीक व्यवस्थापन कळते. परंतु रिक्त पदांमुळे कृषिसेवकांनाही या कामाला मर्यादा येत आहेत. मात्र आता कृषी विभागाने ही अडचण सोडविण्यासाठी पावले उचलले असून, राज्यात तब्बल दोन हजार १०९ कृषिसेवकांची भरती करण्याचे निश्चित झाले आहे. यात नाशिक जिल्ह्यात ३३६ पदे भरली जाणार आहेत.
शेतकऱ्यांना योजना समजावून सांगणे, पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यासह कीटकनाशके, बियाणे, खतांचा सल्ला देण्यापासून तर योजनांची माहिती, कागदपत्रे आणि योजनांच्या लाभास निधी मिळवून देण्यापर्यंत सिंहाचा वाटा उचलणारा घटक म्हणजे कृषिसेवक! त्यातच शेती व कृषीशी संबंधित समस्या वाढल्याने कृषिसेवक शेतकऱ्यांचे जिवाभावाचे मित्रही बनत आहेत. परंतु रिक्त पदांमुळे एका कृषिसेवकाकडे अनेक गावांचा कारभार असल्याने या कामालाही मर्यादा पडत होत्या. कृषिसेवकांच्या तब्बल दोन हजार ६३८ जागा रिक्त असल्याने अखेर कृषी विभागात शासनाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कृषिसेवक पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात आठही विभागांत ही पदभरती करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत. यामध्ये दोन हजार १०९ पदांसाठी ही भरती होईल. कृषिसेवकाच्या संदर्भाच्या जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या असून, लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
तीन वर्ष कंत्राटी नियुक्ती
गट ‘क’ संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषिसेवक म्हणून सरळसेवेने भरली जाणार आहेत. राज्यात दोन हजार ६३८ पदे रिक्त असून, ८० टक्के म्हणजेच दोन हजार १०९ पदे भरण्यात येतील. कृषिसेवकांना १६ हजार रुपये प्रतिमहा एकत्रित मानधन देण्यात येणार असून, तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्यात येणार आहे.
बेरोजगारांना मिळणार संधी
कृषी पदवी व पदविका घेतलेले अनेक बेरोजगार असून, ते विविध कृषी कंपन्यांत कार्यरत आहेत. त्यांना आता शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे.
अर्थात जाहिरात प्रसिद्ध झाल्या, मात्र अर्ज दाखल करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे पुन्हा सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील प्रवर्गातील ही भरती होईल. कृषिसेवक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे आहे.
...अशी होईल परीक्षा
अर्ज दाखल केल्यावर संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व या विषयाची प्रत्येकी २० गुणांची, तर कृषीविषयक १२० गुण अशी २०० गुणांची परीक्षा होईल. यासाठी १४० वस्तुनिष्ठ आधारित प्रश्न असतील. भरतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपये, अमागासवर्गीय उमेदवारांसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

