कॉँग्रेसच्या महिला आमदारावर जीवघेणा हल्ला, नशेच्या धुंदीत आरोपीने चाकूने भोकसले
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या महिला आमदार छन्नी साहू यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. नशेच्या धुंदीत आरोपीने साहू यांना चाकूने भोसकले. राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगाव पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या जोधरा गावात ही घटना घडली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिलेश्वर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. खुज्जी मतदारसंघाच्या आमदार छन्नी साहू या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जोधरा गावात आल्या होत्या. याच कार्यक्रमात नशेच्या धुंदीत असणाऱ्या आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या आरोपीला डोंगरगाव पोलीस स्थानकामध्ये कैद करण्यात आले आहे. मात्र सत्ताधारी आमदारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीनंतर दिलेल्या माहितीनुसार, आमदार छन्नी साहू या मंचावर असताना नशेत असणाऱ्या खिलेश्वर याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात साहू यांच्या हाताला इजा झाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरच खुलेआम हल्ला झाल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. छत्तीसगडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याची टीका भाजपने केली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.
कोण आहे छन्नी साहू?
छन्नी साहू या काँग्रेसच्या आमदार आहेत. 2018मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी खुज्जी मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार हिरेंद्र कुमार साहू यांचा पराभव केला होता. छन्नी साहू यांना 71 हजार 733 तर हिरेंद्र साहू यांना 44 हजार 236 मतं मिळाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.