Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘पुण्यनगरी आता पापनगरी’!

‘पुण्यनगरी आता पापनगरी’!


माझ्यासोबत पत्रकारितेत २० वर्षे  ‘लोकमत’ मध्ये सहकारी म्हणून काम केलेले नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार श्री. विनायक एकबोटे यांनी काल एक लेख वाँट्सअॅपवर पाठवला. तो वाचून असे वाटले की, हा लेख महाराष्ट्रभर गेला पाहिजे. विनायक एकबोटे या गुणवत्ता असलेल्या पत्रकाराला ‘संंपादक’ होण्याची संधी मिळाली नाही, तरी त्याच्या गुणवत्तेला उणेपणा येत नाही.  त्यांना आयुष्यभर निष्ठेने आणि सत्त्वाला जागून पत्रकारिता केली आहे. आज सत्य बालणाऱ्यांची संख्या जशी कमी आहे.... त्याचप्रमाणे स्पष्ट लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या फारच कमी आहे. सध्याच्या सगळ्या वाहिन्या भाजपाच्या चरणी लीन आहेत. बाकी अपवादात्मक काही वृत्तपत्रे सोडली तर अग्रलेखाची किंवा तडाखेबाज लेखाची चर्चा कुठेही होत नाही. 
महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीला सध्या काही  पापी लोकांनी वेढा घातलेला आहे. पुण्याची सगळी संस्कृती सुसंस्कृतपणाकडून धटींगणपणाकडे चालली आहे. आता पुण्यात ‘ड्रगमाफियांचा’ शिरकाव झालेला आहे.  अशा धटींगणपणाला सत्तेमधील काही राजकीय नेते पाठीशी घालत असल्याची खुलेआम चर्चा पुण्यात खुलेपणाने होत आहे. ही चर्चा का व्हावी? हे चांगले लक्षण नाही. महाराष्ट्र भलतीकडे चालला आहे. अशावेळी पुण्यातील पत्रकारांनी आवाज उठवायला हवा होता... गरज पडली तर पत्रकार संघटनांनी  शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांकडे  आपल्या भावना व्यक्त करायला हव्या होत्या. तसे घडल्याचे दिसत नाही. पण, ५०० मैलावर असलेल्या विनायक एकबोटे यांनी ‘पुण्यनगरी’मध्ये घडणाऱ्या या भयानक घटनांचा जो पंचनामा केला तो महाराष्ट्रापर्यंत जावा म्हणून त्यांचा हा लेख मुद्दाम सर्वांना पाठवत आहे. 

श्री. विनायक यांचे शतश: अभिनंदन ... नांदेडला जाईन तेव्हा त्यांचा सत्कारच करीन... परिणामांची पर्वा न करता पत्रकारांनी अधिक प्रखर होण्याची गरज आहे. हेच विनायकराव तुमच्या लेखातून स्पष्ट होतेय...
तुमचे अभिनंदन 
- मधुकर भावे


‘पुण्यनगरी आता पापनगरी’!

शाळा, काँलेजात असताना एक मराठी म्हण ऐकली होती. ‘पुणे तिथे काय ऊणे!’ त्यावेळी या म्हणीचा अर्थ पुण्यात साहित्य, संस्कृती, विद्वत्ता, बुद्धीमत्ता आदिंची काहीच कमी नाही असा होता. परंतु आता काळ बदलला, तसा म्हणीचा अर्थही बदलला आहे. आज म्हणीचा अर्थ पुण्यात अपघात, ड्रग्ज, अंमली पदार्थाची काहीही कमतरता नाही असा झाला आहे. हे पुणे आणि महाराष्ट्राचे दुर्देव आहे.
महाराष्ट्रात पुणे शहराची ओळख एक शांत, सुसंस्कृत, सभ्य शहर अशी होती. महाराष्ट्रातील अनेक भारतरत्ने पुण्यात वास्तव्याला असायची. जो काही चांगला विचार, योजना असेल त्याचा उगम पुण्यातून होत असे. त्यामुळे या शहराकडे इतर शहरातील लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण हा अतिशय आदरयुक्त असा होता. परंतु दुर्देवाने राजकारण्यांनी विकासाच्या नावाखाली जो काही असमतोल विकास केला त्याचा पहिला फटका पुण्याला बसला. अनेक कंपन्या, उद्योग पुण्यात आणले गेले. त्यासोबत अनेक शिक्षणसंस्था, काँलेजेस पुण्यात आणले गेले. पुण्याला आयटीचे हब करण्याचा जणू चंगच बांधला गेला. त्याचा परिणाम असा झाला की, शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने लाखोंचे लोंढे पुण्याला वास्तव्याला आले. 

सहाजिकच जुन्या पुण्यातील आराखडा त्यांना कमी पडू लागला. त्यामुळे पुण्याच्या आजुबाजुला असलेल्या अनेक कृषी जमिनी अकृषक करुन त्यावर सिमेंटची जंगले उभे राहू लागले. इतर गावातून येणा-या लोकांची पुण्यात घरे घेण्यासाठी रिघ लागलेली पाहून अनेक बिल्डर पुण्यात जन्माला आले. वाढणारी गर्दी पाहून जमिनीचे व घरांचे भाव गगनाला भिडू लागले. त्यातून पुण्यात वडिलोपार्जित जमिनी असलेल्या लोकांचा एक नवश्रीमंत वर्ग जन्माला आला. पुण्यात वाढणारी गर्दी ही मतात परावर्तीत करुन निवडणुका सहज जिंकता याव्यात या हेतुने मग अनेक राजकारणी नव्याने तयार झाले. त्यांच्या मागे मग प्रस्थापित राजकारणी नेते खंबीरपणे उभे राहू लागले. पुण्यात आलेल्या अनेक नवीन कंपन्यात याच राजकारणी लोकांची हिस्सेदारी असल्याची चर्चा उघडपणे होते. त्यात तथ्यही असेल. कारण अशा गोष्टीचे पुरावे मिळत नसतात. परंतु हे सर्व घडत असताना पुण्याची पुण्याई संपत चालली व पुण्याचा सत्यानाश होत आहे याचा कोणाला खेद होता ना खंत होती. याचे कारण हा विकास लोककल्याणाच्या हेतुने झालेला नाही तर राजकीय दृष्टीकोणातून झाला आहे. त्यात फायदा लोकांचा कमी राजकारण्यांचा जास्त आहे.

पुण्यात नव्याने आलेल्या गर्दीचे चोचले पुरवण्यासाठी मग बार, रेस्टारंट, पब तयार झाले. त्याच्या रक्षणासाठी मग आपल्याला हवे ते अधिकारी तिथे नियुक्त करण्याची शक्कल राजकारणी नेत्यांनी लढविली. जे अवैध धंदे चालतात त्यातूनही नफा आणि जे मर्जीतील अधिकारी नियुक्त केले जातात त्यातून आपलाच फायदा. असा दुहेरी फायदा होऊ लागल्याने मग पुण्यात होणा-या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणे अपरिहार्य होते. त्यातून पुण्याची अशी काही वाट लागली की आता पुण्यनगरी पापनगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. यापूर्वी मुंबईची अशीच वाट लागली. परंतु आता मुंबईची वाट लावण्याला मर्यादा आल्याने सगळा ओढा मुंबईजवळ असलेल्या पुण्याकडे लागला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात याबाबत लोकांना सतर्क केले आहे. त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. खरं म्हणजे सर्व उद्गोग, कंपन्या एकाच शहरात केंद्रित करणे गैर आहे. महाराष्ट्रात उद्योग आला की, पुण्यातच का? तो उद्योग गडचिरोली, भंडारा, नंदूरबार अशा अविकसित भागाकडे का नेला जात नाही? खरं म्हणजे मुंबई, पुण्यातील अनेक उद्योग राज्यात इतरत्र हलविण्याची नितांत गरज आहे. 
पुण्यात वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक कंपन्या इतर राज्यात गेल्याचे मागे बातम्यात आले. कंपन्या इतर राज्यात गेल्या पेक्षा राज्याच्या इतर भागात गेल्या तर त्यात वावगे काय? खरी गोम येथे आहे. पुण्यातील कंपन्यात, उद्योगात कोणकोणाचे हिस्से आहेत याची एकदा चौकशी करा. मग कळेल पुण्यात ज्या घटना घडत आहेत त्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस हतबल का झाले आहेत. अवघी २०-२२ वर्षाची तरुण पिढी जर पुण्यात व्यसनाधीन होत असेल तर या देशाचे भवितव्य काय याचाही विचार कोणाच्या मनात येत नाही हेच धक्कादायक आहे. धंगेकरासारखा आमदार जाहीर पणे मंत्र्यावर आरोप करतो. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. तो आरोप खरा की खोटा हा प्रश्न महत्वाचा नाही. परंतु आरोप करण्यासारखी परिस्थिती पुण्यात आहे की नाही हे महत्वाचे. त्याचे उत्तर पुण्याचे बारा वाजले असेच आहे. सरकारने तातडीने पुण्यातील गर्दी कमी करावी. उद्योग, कंपन्या राज्यात इतरत्र स्थलांतरित कराव्यात. जे गुन्हे घडत आहेत त्याची निःपक्षपणे चौकशी करुन त्यातील सत्य चव्हाट्यावर आणावे. आजकाल कोणतीही गोष्ट राजकीय पाठबल असल्याशिवाय होत नाही. पुण्यातील ड्रग्ज, अंमली पदार्थाच्या व्यवहारात कोणाकोणाचे हात गुंतलेत त्याचा शोध घ्यावा व ते लोकांसमोर आणावे. पुणे आजच नियंत्रणाबाहेर गेले आहे. उद्या पुण्यात अराजकाची स्थिती असेल.
तरुणांच्या पिढाली व्वसनाधीन होण्यापासून वाचवायचे असेल तर संपूर्ण राज्यातील बार, रेस्टाँरंट रात्री अकरा वाजता बंद झालेच पाहिजेत. हा नियम कडकपणे पाळला जावा. त्याला मुंबई, पुणेचा अपवाद असता कामा नये. हा नियम असता तर अग्रवालचा दिवटा उत्तररात्री घराबाहेर पडला नसता. अपघात झाला नसता. दोन निष्पाप जीव गेले नसते. त्या दोघांच्या मृत्युला त्या अल्पवयीन मुलांसोबत सरकारलाही तेवढेच जबाबदार धरण्याची गरज आहे. कशासाठी, कोणासाठी मुंबई, पुण्यात बार, पब उघडे ठेवले जातात. त्यात फायदा कोणाचा आहे हे एकदा जनतेला कळू द्या.  
विनायक एकबोटे
ज्येष्ठ पत्रकार नांदेड
दि. २५-६-२४
मो.नं.7020385811

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.