Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" अखेर पोप फ्रान्सिस देवाला भेटले ", 'त्या ' फोटोवरून काँग्रेसचा चिमटा :, भाजपाच्या टीकेनंतर ख्रिश्चनांची माफी मागत म्हणाले

" अखेर पोप फ्रान्सिस देवाला भेटले ", 'त्या ' फोटोवरून काँग्रेसचा चिमटा :, भाजपाच्या टीकेनंतर ख्रिश्चनांची माफी मागत म्हणाले 


इटलीच्या अपुलिया शहरात नुकतीच जी-७ परिषद पार पडली. या परिषदेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधला.

मोदी या दौऱ्यावेळी जगभरातील अनेक नेत्यांना भेटले तरी सर्वाधिक चर्चा झाली ती मोदी आणि पोप फ्रान्सिश (ख्रिस्त धर्मगुरू) यांच्या भेटीची. इटलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून काँग्रेसने मोदींना चिमटा काढला होता. तर भाजपाने काँग्रेसवर टीका केली. या टीकेनंतर काँग्रेसने ख्रिश्चन समुदायाची माफी मागितली आहे. जी-७ परिषदेत मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटले. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर केरळ काँग्रेसने समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की “अखेर पोप यांना देवाला भेटण्याची संधी मिळाली.”
मोदी यांनी अलीकडेच काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ते म्हणाले होते की, “त्यांना देवाने काही उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून पृथ्वीवर पाठवलं आहे”, तसेच एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी जैविकदृष्ट्या जन्मलेलो नाही”, “मी गंगा मातेचा पुत्र आहे.” मोदींच्या याच वक्तव्यांचा संदर्भ देत काँग्रेसने म्हटलं होतं की “अखेर पोप देवाला भेटले”. दरम्यान, काँग्रेसने या पोस्ट समाजमाध्यमांवरून हटवल्या आहेत. मात्र भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने आरोप केला आहे की “काँग्रेसने समस्त ख्रिश्चन बांधव, पोप आणि देवाचा अपमान केला आहे.”

केरळ भाजपाचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “काँग्रेसचं एक्स हँडल कट्टरपंथी आणि शहरी नक्षलवाद्यांकडून चालवलं जात आहे. आता हे लोक पोप फ्रान्सिस आणि ख्रिश्चन समुदायाचा अपमान करू लागले आहेत.” सुरेंद्रन यांनी याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल आणि राहुल गांधींकडे याचं उत्तर मागितलं आहे. तर, केरळ भाजपाचे सरचिटणीस जॉर्ज कुरियन म्हणाले, “काँग्रेसच्या या पोस्ट आक्षेपार्ह आहेत. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. काँग्रेसने प्रामुख्याने केरळमधील लोकांचा अपमान केला आहे.”
भाजपाच्या या आरोपांनंतर काँग्रेसने पोप फ्रान्सिस यांच्या या वक्तव्याचा हवाला देत उत्तर दिलं आहे. “देवाची मस्करी करणं म्हणजे अधर्म नाही”, असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने सुरेंद्रन आणि जॉर्ज कुरियन यांना टॅग करत म्हटलं आहे की, “बेटर लक नेक्स्ट टाईम…” केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व्ही. टी. बलराम यांनी पक्षाच्या पोस्टचा बचाव करत म्हटलं आहे, “हे केवळ एक व्यंग होतं. यातून केवळ मोदींच्या अलीकडच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली होती. मोदी स्वतःच म्हणाले होते की ते सामान्य व्यक्ती नाहीत, त्यांना ईश्वराने पृथ्वीवर धाडलं आहे.” दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर केरळ काँग्रेसने त्यांची पोस्ट डिलीट केली आहे. तसेच यातून ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असं म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.