Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार यांच्यामुळेच भाजपाच्या ब्रँडला बसला धक्का :, RSS च्या मुखपत्रातून मोदी - शहानां खडेबोल

अजित पवार यांच्यामुळेच भाजपाच्या ब्रँडला बसला धक्का :, RSS च्या मुखपत्रातून मोदी - शहानां खडेबोल 


लोकसभा २०२४ निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. ४८ पैकी केवळ १७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागा जिंकल्या. या निकालावर आरएसएसच्या मुखपत्रात भाष्य करण्यात आलं आहे.

अजित पवार यांच्यासोबत युती केल्याने भाजपच्या ब्रँडला धक्का बसला, अशी टीका मुखपत्रातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेत शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडे पुरेसं बहुमत होतं. तरी देखील अजित पवार यांना सोबत का घेतलं? असा सवाल देखील आरएसएसच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासोबत युती केल्याने भाजपच्या ब्रँडला धक्का बसला, अशी टीकाही मुखपत्रातून करण्यात आली.


अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तरी येत्या २ ते ३ वर्षात राष्ट्रवादीतील भांडणामुळे शरद पवार यांची शक्ती कमी झाली असती. संघाला दहशतवादी संघटना असे संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपमध्ये घेतल्यामुळे स्वयंसेवकांची मने दुखावली, असंही मुखपत्रात म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरएसएच्या मुखपत्रातून भाजपाला कानपिचक्या देणारा लेख लिहण्यात आला. हा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीव सभासद असलेल्या रतन शारदा यांनी लिहिला. या लेखातून त्यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते संघाकडे मदत मागण्यासाठी आलेच नाहीत, त्यामुळे भाजपची इतकी खराब कामगिरी झाली. हा निकाल अतिआत्मविश्वासात भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा आहे, असा टोलाही आरएसएसच्या मुखपत्रातून लगावण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींनी दिलेला ४०० पारचा नारा हे भाजपासाठी दिलेले लक्ष होते. त्यांनी विरोधकांना दिलेलं हे आव्हान होतं. मात्र, हे भाजपच्या अनेक नेत्यांना समजलंच नाही. केवळ समाजमाध्यमांवर सेल्फी टाकून नव्हे तर प्रत्यक्षात मैदानावर उतरून ध्येय साध्य केलं जातं, असा टोमणाही मुखपत्रातील लेखातून लगावण्यात आला.

जर भाजपाच्या कार्यकर्त्यांना संघाच्या मदतीची गरज वाटली नसेल, तर ती का वाटली नाही, याचाही खुलासा करावा लागेल, असंही लेखात मांडण्यात आलं. दुसरीकडे शिंदे आणि भाजप यांच्याकडे विधानसभेत बहुमत असताना अजित पवार यांना महायुतीत का घेतलं? असा सवालही मुखपत्रातून विचारण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.