Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, मग अचानक गायब झाली; पंधरा वर्षांनी शोध लागला

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, मग अचानक गायब झाली; पंधरा वर्षांनी शोध लागला 

घरच्यांच्या विरोधात जाऊन पंधरा वर्षांपूर्वी महिलेने प्रेमविवाह केला. मग एक दिवस अचानक गायब झाली. यावेळी दागिने घेऊन पळून गेल्याचा दावा सासरच्यांनी केला. मात्र पंधरा वर्षांनी महिलेचा अखेर शोध लागला आणि नातेवाईकांसह पोलीसही हैराण झाले.

महिलेच्या सासरच्या घरातील सेप्टीक टँकमध्ये तिचा सांगाडा सापडल्याने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर पती परदेशात असून, त्याला केरळमध्ये परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, कला नामक महिलेचे 15 वर्षांपूर्वी अनिल कुमार याच्या लग्न झाले होते. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र 15 वर्षांपूर्वी अचानक कला घरातून गायब झाली. यानंतर घरच्यांनी कला दागिने घेऊन दुसऱ्यासोबत पळून गेल्याचा कांगावा केला होता.

पतीने कला गायब झाल्याची तक्रारही केली नाही. तब्बल 15 वर्षांनंतर अंबालपुझा पोलिसांना कला गायब असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. तपासाअंती अखेर सत्य समोर आले आणि सर्वच हैराण झाले. कला पळून गेली नसून, तिची हत्या करून मृतदेह घरातील सेप्टीक टँकमध्ये टाकल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेत फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले. घटनास्थळावर पोलिसांना हत्या झाल्याचे दर्शवणारे काही पुरावेही सापडले आहेत. कलाचा पती अनिल कुमार या प्रकरणात मुख्य संशयित आहे. सध्या तो दुसऱ्या पत्नीसह इस्राईलमध्ये नोकरी करतो. त्याला इस्राईलमधून केरळमध्ये आणण्यासाठी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. तर अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.