पहिल्या खासदार, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचे पतीच तैनात !
राजस्थानमधील भरतपूर येथील काँग्रेसखासदार संजना जाटव यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी संजना जावट आपल्या पतीमुळं चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, संजना जाटव यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या पतीवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं संजना जाटव या पहिल्या खासदार ठरल्या आहेत, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचा पती तैनात करण्यात आला आहे.
संजना जाटव यांनी गेल्या २० दिवसांपूर्वी आपला पती कप्तान सिंह यांची वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) म्हणून शिफारस केली होती. या शिफारसीनंतर आता अलवरचे एसपी आनंद यांनी आदेश जारी केले आहेत. संजना यांचे पती कप्तान सिंह राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून आता ते भरतपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संजना जाटव यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत.
युवा महिला उमेदवारांमध्ये संजना जाटव यांचा समावेश आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्या भरतपूर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. संजना जाटव या काँग्रेससोबत 'लडकी हूं लड सकती हूं' मोहिमेत सामील झाल्या होत्या. त्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या जवळच्या असल्याचं मानलं जातं. तसंच संजना जाटव यांनी काँग्रेस कार्यकारिणीतही काम पाहिलं आहे.दरम्यान, पती पीएसओ झाल्यानंतर संजना जाटव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझे पती हेच माझे सामर्थ्य आहे, आता ड्युटीच्या वेळीही ते माझ्यासोबत राहतील. ते आधीही माझ्यासोबत होते आणि आताही आहेत. ते माझी ताकद आहेत, असे संजना जाटव यांनी सांगितलं.पुढे संजना जाटव म्हणाल्या की, खासदार झाल्यानंतरही काहीही बदललं नाही, फक्त काम वाढलं पण व्यवहार मात्र तशाच आहे. दरम्यान, संजना यांचे पती कप्तान सिंह यांनीही सांगितले की, आम्हाला खासदाराच्या संरक्षणाचं काम मिळालं आहे, ज्यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत. खासदारांना आमच्यासोबत अधिक सुरक्षित वाटेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.