चिखल बघून अजित पवार फिरले माघारी, पण भुजबळ चिखलातून वाट काढून गेले
नाशिक : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीमधील सर्व नेते प्रचाराला लागले आहेत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते दिल्लीवारी करत आहेत.
त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी सरकारी योजनांची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा वसा हाती घेतला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील प्रचाराचा नारळ नाशिकमध्ये फोडला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. जनसन्मान यात्रेच्या पहिल्या मेळाव्यासाठी जात असताना दिंडोरीत पावसाने झालेल्या चिखलामुळे अजित पवारांसह नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
दिंडोरीत जन सन्मान यात्रेच्या मेळाव्याच्या ठिकाणी चिखल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनसन्मान यात्रेच्या पहिल्या मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी जात असताना नेतेमंडळींना चिखलाचा सामना करावा लागला. यावेळी छगन भुजबळ हे चिखलातून वाट काढत कार्यक्रम स्थळी पोहोचले. तर चिखल पाहून अजित पवार मागे थांबले होते. त्यानंतर अजित पवारांसाठी गाडी मागवण्यात आली. अजित पवार गाडीत बसून कार्यक्रम स्थळी गेले. यावेळी अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी गाडीतून कार्यक्रमस्थळापर्यंत प्रवास केला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी झालेल्या चिखलामुळे नेत्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
नागरिकांशी संवाद साधण्यासाठी यात्रा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. दिंडोरीपासून यात्रेचा आरंभ झाला. यावेळी अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि अन्य पदाधिकारी सहभागी झाले. यात्रेत शासकीय वाहनांसह अन्य २०० हून अधिक वाहनांचा ताफा आहे. मात्र या ताफ्यात गुलाबी रंगाची वाहने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग वाहनांसाठी वापरण्यात आला आहे. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकारी यांच्यासाठी दोन-तीन व्हॅनिटी वाहने गुलाबी रंगाचे आहेत. याशिवाय काही छोटी वाहनेही गुलाबी असून या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह इतर शासकीय योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.