मुंबई : बदलापूर चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मारताना पोलिसांना नेमके काय लपवायचे होते? अक्षय शिंदे याचा इन्काऊंटर करताना पोलिसांना नेमके कुणाला वाचवायचे आहे?
असा सवाल करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. त्याचवेळी बदलापूर शाळेशी संबंधित असलेले विश्वस्त आपटे शेवटपर्यंत का फरार राहिले? पोलिसांनी त्यांना का शोधून काढले नाही? असे एक ना अनेक सवाल अंधारे यांनी विचारले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ही घटना इतक्या साध्या सरळ पद्धतीने बघण्यासारखी नक्कीच नाहीये. मी केवळ लक्षात आणून देतेय की हैदराबादमध्येही अशाच एका केसमध्ये चार आरोपींवर गोळीबार करताना स्वत:च्या संरक्षणासाठी आम्ही गोळीबार केला, असेच स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेले होते. त्यामुळे त्या प्रकरणातील पुढील कोणतेच तपशील समोर आले नाहीत.असेच काहीसे बदलापूर प्रकरणात देखील घडले आहेत. शाळेशी संबंधित असणारे आपटे शेवटपर्यंत फरारच राहिले. याप्रकरणातील कोणतेच धागेदारे पोलिसांच्या हाताला लागले नाही. परंतु आरोपी अक्षयच्या भावाने आणि आईने जी माहिती पोलिसांना दिली, ती देखील माहिती महत्वाची आहे. म्हणून हे प्रकरण साधेसोपे नाहीये, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
अक्षय शिंदेने आत्महत्या केली की त्याचा एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसांनी प्लॅन केला? हे समोर आले पाहिजे. अक्षय शिंदेला मारताना पोलिसांना नेमके काय लपवायचे होते? आपटे नावाचा शेवटपर्यंत का फरार राहिला? याप्रकरणातील शाळेशी संबंधित एकाही आरोपीवर का अटकेची कारवाई झाली नाही? असे सवाल अंधारे यांनी विचारले.
नेमकी घटना कशी घडली?
तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांजवळील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कंबरेवरील बंदूक खेचून निलेश मोरे यांच्यावर अक्षयने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात गेली तर 2 गोळ्यांचा वेध चुकला.जखमी निलेश मोरेने त्याही परिस्थितीत अक्षय शिंदे याला प्रत्युत्तर दिले. सोबत असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. त्यावेळी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली. दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं. दरम्यान,अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.