५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २०१४ च्या लाच प्रकरणातन्यायालयाने आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला दोषी ठरवून ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मोरबी जिल्ह्यातील मालिया पोलीस ठाण्याच्या एका कॉन्स्टेबलवर पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी लाच मागितल्याचा आरोप असून त्याला एसीबीने रंगेहाथ पकडलं.
याच प्रकरणात स्थानिक न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये तक्रारदार मनोजची वहिनी पूजा हिला तिच्या पतीला भेटण्यासाठी नैरोबीला जायचं होतं. ज्यासाठी पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेदरम्यान पोलिस व्हेरिफिकेशनदेखील होतं, त्यासाठी १७ मार्च २०१४ रोजी पूजाला मालिया पोलीस स्टेशनमधून फोन आला. पूजा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.
कॉन्स्टेबल अमरतभाई यांनी सही घेतली आणि नंतर ५०० रुपये भरण्यास सांगितले. पूजाने विचारले की, सर्व फी आधीच भरली आहे तर आता पैसे का द्यायचे? दुसऱ्या दिवशी कॉन्स्टेबल अमरत मकवाना यांनी फोन करून तुम्हाला पासपोर्ट हवा असेल तर ५०० रुपये द्यावे लागतील, अन्यथा पासपोर्ट बनवणार नाही, असं सांगितलं. मात्र पूजाला लाचेची रक्कम द्यायची नव्हती.मनोजने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली. न्यायालयाने मालीया पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अमरत मकवाना याला दोषी ठरवलं. न्यायालयाने आरोपी मकवाना याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमाखाली दोषी ठरवून ५ वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.