'जलसंपदा'च्या अधीक्षक अभियंत्याकडे उत्पन्नापेक्षा ज्यादा 2.54 कोटींची
संपत्ती! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात सत्य उघड; सदर बझार
पोलिसांत गुन्हा
सोलापूर : भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे याच्यावर २०१८ मध्ये लाच प्रकरणी कारवाई झाली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली.
चौकशी पूर्ण झाल्यावर कांबळेकडे उत्पन्नापेक्षा दोन कोटी ५४ लाख १८ हजार ४८८ रुपयांची (५७.१८ टक्के) संपत्ती अधिक असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी त्याच्यासह कुटुंबीयांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.भीमा कालवा मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामांचे बिल काढताना तक्रारदाराकडे काही लाखांची लाच कांबळे याने मागितली. त्यावेळी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती. २०१८ मध्ये कांबळेला त्याच्या घरी लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्याला अटक झाली होती. त्यावेळी त्याच्या शासकीय वाहनाचा चालक देखील अटकेत होता.
दरम्यान, कांबळे याने सप्टेंबर १९८९ ते मार्च २०१८ या कार्यकाळात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमावल्याचा संशय आल्याने विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक अरुण देवकर, जगदीश भोपळे, अजितकुमार जाधव, संजीव पाटील यांच्यासह विद्यमान उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी त्यासंदर्भातील सखोल तपास केला. त्यावेळी कांबळे याने त्याच्या कार्यकाळात उत्पन्नापेक्षा तब्बल ५७ टक्के संपत्ती जादा कमावल्याचे समोर आले. त्यात विविध शहरांमधील फ्लॅट, जमीन, सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे या प्रकरणी तपास करीत आहेत.
कांबळेच्या कुटुंबीयांविरुद्धही पोलिसांत गुन्हा
वरिष्ठ पदावर काम करताना राजकुमार कांबळे याने गैरमार्गाने संपत्ती जमा केली. त्याच्याकडे उत्पन्नापेक्षाही अधिक मालमत्ता असल्याची माहिती असतानाही ती संपत्ती बाळगून कांबळेला भ्रष्ट मार्गाने अपसंपदा मिळविण्यास अपप्रेरणा व मदत केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.