"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
अमरावती : मी जे बोलतो, तेच पीएम मोदी बोलतात. वर्षभरापासून मी संविधान रक्षण व आरक्षणाची मर्यादा वाढविण्यावर बोलतो आहे. जात जनगणनेवर मी ठाम आहे. मात्र, पीएम मोदी मला आरक्षणविरोधी व संविधानविरोधी ठरवत आहेत. उद्या ते अशीही दिशाभूल करतील की, मी जात जनगणनेच्या विरोधात आहे. जणू मोदींची मेमरी लॉस झाली आहे, अशी घणाघाती टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे शनिवारी केली.
उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी धामणगाव रेल्वे येथे प्रचारसभा घेतली. राहुल गांधी पुढे म्हणाले, ज्या बैठकीत महाराष्ट्रातील सरकार चोरले गेले, त्या बैठकीला अदानी होते. सरकार पाडण्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले गेले. सरकार चोरण्याचा हा असंवैधानिक प्रकार धारावीमुळे घडला. सरकार चोरायचे आहे, धारावीची जमीन हडपवायची आहे, हे संविधानात कुठे लिहिले आहे, असा सवाल करीत, त्या मोबदल्यात धारावीची एक लाख कोटी रुपयांची गरिबांचा जमिनीचा सौदा झाल्याचा आरोप त्यांनी केला. धामणगाव रेल्वे येथे खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक पथकाने तपासणी केली तथा त्यांची बॅगदेखील तपासण्यात आली.
...हे सामान्यांविरुद्धचे शस्त्र
जीएसटी हे सामान्यांविरुद्धचे शस्त्र असून, तो पैसा उद्योगपतींच्या घशात घातला जातो. त्यातून देशातील २५ अब्जाधीशांचे १६ लाख कोटींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले. धारावीची जमीन देत असाल तर तितकीच रक्कम महाराष्ट्रातील जनतेला द्या, अशी मागणी करत ती रक्कम आम्ही देऊ, असे आश्वासन गांधी यांनी दिले. हाती असलेले संविधान दाखवत आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीत ठरावीक अधिकाऱ्यांचा सहभाग, विविध क्षेत्रांतील दलित, आदिवासी, ओबीसींचा नगण्य सहभाग आदींवर भाष्य केले.
दहा लाखांना रोजगार देऊ...
चिमूर : आमचे सरकार पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील १० लाख युवकांना रोजगार देईल. अडीच लाख रिक्त जागा भरू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी चिमूर येथील सभेत दिली. मोदी सरकारने नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. ही गरिबांना मारण्याची, लघु व मध्यम उद्याेगांना संपविण्याची हत्यारे आहेत.
भाजप सत्तेत आहे तोपर्यंत देशात रोजगार निर्माण होऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिभूमी चिमूर येथे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.