नाशिक : पतीसाठी सोन्याची अंगठी, पैसे आणावे यासाठी पतीसह सासू-सासऱ्यांनी छळ केल्याने उपनगर येथील नवविवाहितेने जीवन संपविले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतुजा वीररत्न आहिरे (२३, रा. आनंदनगर, नाशिक रोड) असे जीवन संपविलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ऋतुजा हिने राहत्या घरात रविवारी (दि.१७) गळफास घेत जीवन संपविले. शीतल अरुण पगारे (रा. जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी २३ आॅक्टोबरपासून ऋतुजाचा छळ सुरू केला. ऋतुजाचा पती वीररत्न साहेबराव अहिरे, सासू भारती अहिरे व सासरे साहेबराव अहिरे यांनी ऋतुजाने माहेरून पतीसाठी अर्धा तोळ्याची अंगठी, ५० हजार रुपये व स्वत:च्या अंगावर दागिने आणावे यासाठी छळ केला. ऋतुजा व वीररत्न यांचा महिनाभरापूर्वी विवाह झाला होता.
लग्नानंतर सासरच्यांसोबत देवदर्शनासाठी गेल्यावर संशयित वीररत्नने ऋतुजाच्या चारित्र्यावर संशय घेतला. दरम्यान, ऋतुजाच्या आईने वीररत्न याला चार ग्रॅमचा सोन्याचा वेढा करून दिला. त्यावरून पुन्हा पती, सासू व सासऱ्यांनी तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. यासह तिच्या इन्स्टाग्रामवर एका मित्राचा मेसेज आल्याने तिला मारहाण केली. त्यामुळे त्रस्त झालेली ऋतुजा उपनगरला नातलगांकडे वास्तव्यास गेली. सात नोव्हेंबर रोजी समजूत काढल्यावर ती सासरी परतली होती. मात्र, सासरच्या छळाला कंटाळून तिने रविवारी राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला.
सासूविरोधात अनेक गुन्हे
सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक, क्रूरपणे वागणूक देणे, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करणे, घरांत अनधिकृत प्रवेश करून विनयभंग, अब्रूनुकसानीची धमकी देत खंडणी उकळणे, जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणे या स्वरूपाचे गुन्हे संशयित भारती अहिरे हिच्याविरोधात दाखल आहेत. संशयित भारती हिला नोव्हेंबर २०२३ मध्ये उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशानुसार तडीपार करण्यात आले. मात्र, तरीदेखील ती विनापरवानगी शहरात वास्तव्य करीत असल्याचे समोर येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.