सांगलीत मृत मगरीच्या अंत्यसंस्कारावरून वाद, मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची मागणी
सांगली : नदीत मृत झालेल्या मगरीच्या पार्थिवावर वन विभागाने बेकायदा अंत्यसंस्कार केले असून मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा रविवारी ग्रामस्थांच्या मदतीने दहन करण्यात येईल, असे पत्र ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. वारणा नदीपात्रात दि. २७ जानेवारी रोजी पूर्ण वाढ झालेली मगर मृतावस्थेत वाहत आली होती. ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिली. मृत मगर कोल्हापूर जिल्हा हद्दीत कोथळी परिसरात आढळल्याने त्याच ठिकाणी नदीपात्रात जेसीबीने खड्डा खोदून पार्थिव दफन केले. मगर प्राणी संरक्षित गटात शेड्यूल ए मध्ये असल्याने त्याच्या पार्थिवाची वैद्यकीय तपासणी होऊन मृत्यूचे कारण स्पष्ट होणे गरजेचे आहे.
शवाची विल्हेवाट निश्चित केलेल्या जबाबदार व्यक्तीसमोर होणे अपेक्षित असताना ते झालेले दिसत नाही. शव नदीपात्रापासून १५० मीटर अंतराबाहेर अंत्यविधी करणे आवश्यक असताना पात्रातील खासगी जागेत शव पुरण्यात आले. या प्रकरणी कायद्यानुसार दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोळ यांनी पत्राद्वारे केली आहे. नदीपात्रात कायद्यानुसार कोणतेही पार्थिव पुरता येत नाही. वन्य प्राणी ही सरकारी मालमत्ता असताना खासगी मालकीच्या जागेत का पुरण्यात आला, असा सवाल उपस्थित होत असून याची चौकशी व्हावी. तातडीने मगरीचे शव बाहेर काढून नदीपात्रापासून निषिध्द क्षेत्र वगळून त्यावर दहन विधी करण्यात यावा, वन विभाग या कृतीस टाळाटाळ करत असेल तर आम्हास परवानगी द्यावी, आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने नियमानुसार अंत्यविधी करतो असेही पोळ यांनी पत्रात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.