IPS अधिकारी बनण्याचे स्वप्न भारतातील अनेक तरुण-तरुणी पाहतात. मात्र त्यातील काही मोजक्याच लोकांचे स्वप्न पूर्ण होते. 2008 सालच्या बॅचच्या अधिकारी असलेल्या
अलंकृता सिंह यांचे स्वप्न पूर्ण झाले खरे मात्र त्यांना तडकाफडकी राजीनामा
द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच तो तत्काळ मंजूरही करण्यात आला.
अलंकृता सिंह या लंडन दौऱ्यामुळे वादात सापडल्या होत्या. नेमका काय वाद
झाला होता ते पाहूयात.
कोण आहे अलंकृता सिंह?
अलंकृता सिंह या मूळच्या झारखंडच्या रहिवासी आहेत. 2008 साली त्यांनी UPSC ची परीक्षा पास केली होती.सिंह यांनी 4 वर्षे मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये (LBSNAA) उपसंचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांची नियुक्ती उत्तर प्रदेशात करण्यात आली होती. त्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.2021 साली अलंकृता सिंह यांनी एका वादाला निमंत्रण दिले होते. पोलीस प्रशासनाकडून रितसर सुट्टी मंजूर करून न घेताच सिंह या सुट्टीवर निघून गेल्या होत्या. त्या थेट लंडनला गेल्याचे कळाले होते. लंडनला पोहोचल्यानंतर त्यांनी अतिरिक्त पोलीस महालंचालकांना व्हॉटसअपवरून कॉल करत आपण सुट्टी घेतली असून लंडनला आल्याचे कळवले होते. सुट्टी मंजूर करून न घेताच लंडनला निघून गेल्याने सिंह यांच्याविरोधात चौकशी बसविण्यात आली होती.
निलंबन आणि विभागीय कारवाई
20 ऑक्टोबर 2021 रोजी अलंकृता सिंह कार्यालयात आल्या नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची आणि बेजबाबदारपणाबद्दल कारवाई सुरू करण्यात आली. ऑल इंडिया सर्विहिस रुल्स ,1969 अंतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. 23 डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना लखनऊतील पोलीस महासंचालक कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आणि नंतर त्यांचे निलंबन केले गेले. निलंबनाच्या काळात त्या कोणताही अन्य व्यवसाय, नोकरी करू शकणार नाही अशी समज देण्यात आली होती.
सिंह यांनी दिला राजीनामा
अलंकृता सिंह यांचे पती लंडनला राहतात. त्यांना भेटण्यासाठी त्या तडकाफडकी लंडनला गेल्या होत्या. आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीजानामा देत असल्याचे सिंह यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे. त्यांनी आपला राजीनामा उत्तर प्रदेश सरकारला पाठवला होता, जो तत्काळ मंजूर करण्यात आला. सिंह यांनी प्रशासनाकडे रितसर परवानगी न मागताच सुट्टीवर जाणे हे त्यांना भोवणारे ठरले आहे. अलंकृता सिंह यांनी आपण खासगी जीवनाला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांनी प्रशासनाला सुट्टीची पूर्वकल्पना का दिली नाही, याचे समाधानकारक कारण द्या देऊ शकल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. राजीनामा दिल्यानंतर अलंकृता सिंह या लंडनला गेल्या असून त्या आपल्या कुटुंबासोबत राहात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.