अमरावती : अमरावतीच्या रिद्धपूर येथील मठात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती, याप्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा चौथा आरोपी तिचा सख्खा मामाच निघाला आहे. मठात झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे.
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर महानुभाव पंथाची काशी समजली जाते. रिद्धपूरमधल्या सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सुरेंद्रमुनी आणि त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी गेल्या वर्षभरापासून अत्याचार केले. अल्पवयीन मुलीचं तळघरात नेऊन लैंगिक शोषण करण्यात आलं. या लैंगिक शोषणात अल्पवयीन मुलीच्या मावशीनेही सहकार्य केले, यातून अल्पवयीन युवती 8 महिन्यांची गरोदर झाली.
गरोदर झाल्यानंतर मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्नही केला गेला, पण तो अयशस्वी ठरला. यानंतर मुलीने आई-वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला, त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून सुरेंद्रमुनी, त्याचा सहकारी आणि युवतीच्या मावशीला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी केली असता या प्रकरणात मुलीच्या 35 वर्षांच्या सख्ख्या मामानेही लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झाले आहे. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.ही युवती आश्रमामध्ये वर्षभरापासून सेवेकरी म्हणून राहत होती. युवतीची मावशीही मागच्या अनेक वर्षांपासून याच मठात राहत होती. 2 एप्रिल 2024 ते 2 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान मठामध्येच अल्पवयीन युवतीवर अनेकवेळा अत्याचार केले गेले. सुरेंद्रमुनी तळेगावकर, आश्रमामधलाच बाळकृष्ण देसाई तसंच मुलीच्या मामाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या तिघांसह मुलीच्या मावशीलाही अटक करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.