मुंबई : वसतिगृहाच्या खोलीत गांजा सापडल्यामुळे टाटा समाजविज्ञान संस्थेतील (टिस) विद्यार्थिनीला वसतिगृहातून काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टाटा समाजविज्ञान संस्थेत एकूण सहा वसतिगृहे आहेत. त्यातील तीन मुलींची आहेत. मीडिया स्टडीज या अभ्यासक्रमात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीविरोधात तिच्या खोलीत राहणाऱ्या दुसऱ्या मुलीने तक्रार दाखल केली होती. संबंधित मुलगी धूम्रपान करते, खोलीत कचरा करते, असे तक्रारींचे स्वरूप होते. त्यानुसार वसतिगृहाच्या वॉर्डन डॉ. वैशाली कोल्हे यांनी खोलीची तपासणी केली असता त्यांना संबंधित मुलीच्या सामानात गांजा आढळला. टिसच्या प्रशासनाने यासंदर्भात चौकशी समिती नेमली. समितीसमोर जबाब देताना आपल्याला अडकविण्यासाठी कोणीतरी बॅगेत अमली पदार्थ ठेवल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला. समितीचा चौकशी अहवाल पोलिसांना देत प्रशासनाने ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीला वसतिगृहातून काढले असून, तिला नियमित वर्गांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.