". त्या गावांना निधी देणार नाही, बसा बोंबलत"; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
सावंतवाडी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महायुतीच्या सरपंच नसलेल्या गावांना निधी मिळणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'ज्या गावात उद्धव सेनेचा सरपंच असेल, त्या गावाला निधी नाही, बसा बोंबलत !' सावंतवाडीत भाजप संघटन पर्व कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'मी पक्ष वाढवण्यासाठी आलो आहे, त्यामुळे उद्धव सेनेच्या गावांना निधी दिला जाणार नाही. आपण कितीही टीका करा, पण मी माझा पक्ष वाढवणारच,' असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी हेही स्पष्ट केले की, 'महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्या याद्या फाडल्या गेल्या, तेव्हा आम्ही सहन केलं. आता त्याची परतफेड करावीच लागेल!' या कार्यक्रमात उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. मडुरा येथील उल्हास परब, समीर गावडे आणि सचिन पालव यांच्यासह दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी नितेश राणे यांनी माजी आमदार राजन तेली आणि विशाल परब यांच्यावर नाव न घेता कडक शब्दांत टीका केली. 'सावंतवाडी मतदारसंघात बाहेरची घाण नको. काही जण आमच्या नेत्यांवर टीका करून बाहेर पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संभाषण व्हायरल करण्याचे धाडस केले जाते, अशांना आता सोडायचे नाही,' असे त्यांनी ठणकावले. राणेंनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करत सांगितले की, 'जर कोणी पक्षात परतण्याची स्वप्ने बघत असेल, तर लक्षात ठेवा, दरवाज्यावर मी उभा आहे आणि त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत!'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.