एलॉन मस्क यांच्या मुलाने नाकात बोट घातलं अन्...; 'त्या' कृतीनंतर ट्रम्प यांनी बदलला १४५ वर्षे जुना टेबल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्यातील मैत्री सध्या जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू राहिली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क त्यांच्या मुलासह ट्रम्प यांच्या कार्यालयात पोहोचले होते.
या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या खुर्चीवर बसले होते आणि जवळच एलॉन मस्क यांचा मुलगाही उभा होता. एलॉन मस्क यांच्या मुलाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या मुलाच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये नाक खाजवताना दिसत होता. व्हिडिओमध्ये मस्क यांचा मुलगा नाकात बोट घालत १४५ वर्ष जुन्या रेझोल्युट टेबलजवळ उभा होता. आता ट्रम्प यांनी हा टेबलच बदलला आहे. याला तात्पुरता बदल म्हटले जात असले तरी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन टेबलसह ओव्हल ऑफिसचा फोटो शेअर केला आहे. मात्र, ट्रम्प यांनी हा टेबल का बदलला याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४५ वर्षांनंतर ओव्हल ऑफिसचा टेबल बदलला. या रिझोल्युट टेबलजवळ एलॉन मस्क यांचा मुलगा 'X Æ A-Xii' हा नाकात बोट घालून उभा होता. त्यानंतर त्याने नाकातील बोट टेबलावर पुसले होते. या चार वर्षांच्या चिमुकल्याने केलेल्या कृत्याची बरीच चर्चा देखील झाली होती. त्यानंतर हा १४५ वर्षे जुना टेबल ट्रम्प यांनी बदलला. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी स्वतःला जर्मोफोब म्हटलं होतं. मात्र, टेबल बदलण्याचे कारण काय हे स्पष्ट झालेले नाही.
"निवडणुकीनंतर अध्यक्षांना सात टेबलांपैकी एक निवडण्याचा पर्याय दिला जातो. हे सी अँण्ड ओ डेस्क देखील खूप प्रसिद्ध आहे. त्याचा वापर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश आणि इतरांनी केला आहे. रिझोल्युट डेस्कला दुरुस्तीची गरज आहे. ते खूप महत्वाचे काम आहे. त्यामुळे एक सुंदर टेबल त्या जागी आणलं आहे," असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रिझोल्युट डेस्क गेल्या १४५ वर्षांपासून ओव्हल ऑफिसचा एक भाग आहे. १८८० मध्ये, ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रुदरफोर्ड बी. हेस यांना ही भेट दिली होती. हे टेबल हे ब्रिटीश जहाज HMS Resolute मधील ओक लाकूड वापरून तयार केले गेले. व्हाईट हाऊसच्या मते, हे पहिल्यांदा १९६१ मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या मागणीवरून ओव्हल ऑफिसमध्ये आणण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.