CM देवेंद्र-राज ठाकरेंची सदिच्छा भेट की आणखी काही? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यामुळे चर्चांना उधाण
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले. आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत त्यांचा विश्वासू समजला जाणारा नेता देखील होता. ही सदिच्छा भेट असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत असले तरी पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. यानंतर भाजप नेत्यांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मुंबई, पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. आजच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे. दोन्ही नेत्यांनी जवळपास 1 तासाहून अधिक वेळ चर्चा केली.फडणवीसांच्या आधी विश्वासू नेता शिवतीर्थावर....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी त्यांचे विश्वासू समजले जाणारे मोहित कंबोज हेदेखील शिवतीर्थावर पोहचले होते. त्याशिवाय, भाजपचे काही नेतेदेखील आधीच पोहचले असल्याचे सांगण्याच येत होते. मोहित कंबोज उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाच्या वेळी मोहित कंबोज हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. सूरत-गुवाहाटीमध्ये शिंदेंच्या बंडाच्या वेळी मोहित कंबोज उपस्थित होते.
प्रसाद लाड यांनी काय म्हटले?
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले की, मनसेच्या काही नेत्यांकडून कानावर आलं होतं, की राज ठाकरेंनी त्यांची भेटीसाठी वेळ मागितली असं समजलं होतं. त्यांच्या राजकीय दृष्टीपलिकडे एक चांगलं मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे ते आता मैत्रीच्या नात्यानं भेटले आहेत. त्यातही दोन राजकीय नेते भेटणार म्हणजे काही ना काही राजकीय चर्चा होणार ते टाळता येत नाही, ही कौटुंबिक भेट समजावी असं माझं मत असल्याची अशी प्रतिक्रिया भाजप आमदार, प्रसाद लाड यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.