बांधकाम परवान्यासाठी तब्बल 10 लाखांच्या लाचेची मागणी; कराड नगरपालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा
कऱ्हाड (जि. सातारा) शहरातील बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना सहाय्यक नगररचनाकारासह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रात्री (सोमवारी) सापळा रचून ताब्यात घेतलं.
याप्रकरणी तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारेंसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपाधिक्षक राजेश वाघमारे यांनी दिली. या कारवाईमुळे सातारा जिल्हा प्रशासनासह कऱ्हाड नगरपालिकेत (Karad Municipal Corporation) खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी : कऱ्हाड शहरातील बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराचे पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. त्यांनी बांधकाम परवानगीसाठी २०१७ मध्ये कऱ्हाड नगरपालिकेत अर्ज केला होता. नियमावलीतील बदलाप्रमाणे सुधारित बांधकाम परवानगीसाठी २०२३ मध्ये पुन्हा अर्ज केला.
यादरम्यान सहाय्यक नगर रचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांनी खासगी इसम अजिंक्य देव याच्या समवेत तक्रारदाराला दोन हजार स्क्वेअर फूट वाढीव एफएसआय असल्याचे सांगून बाजारभावाप्रमाणे मिळकतीच्या ८० लाखांपैकी दहा ते बारा टक्के म्हणजेच १० लाख रुपयांच्या रकमेची मागणी पंचासमक्ष केली होती. नुकतीच बदली झालेले तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, पालिका कर्मचारी तोफिक शेख आणि खाजगी इसम अजिंक्य देव यांनी संगनमताने तक्रारदाराकडे लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून पाच लाखांच्या लाचेची मागणी केली असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले होते.
त्याची तक्रार तक्रारदाराने दाखल करताच सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, नीलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, विक्रमसिंह कणसे यांनी काल (सोमवारी) सापळा रचून पाच लाखांचा पहिला हप्ता घेताना पालिका कर्मचारी तोफिक शेख याला रंगेहात पकडले.नुकतीच बदली झालेले कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, तोफिक शेख व खाजगी इसम अजिंक्य देव यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा एसीबीने सहाय्यक रचनाकार स्वानंद शिरगुप्पे आणि तोफिक शेख याला ताब्यात घेतले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.