पोलीस दिवसभर कलेक्शन करत फिरतात? पोलिस ठाण्यांत तडजोड गँग? धक्कादायक माहिती समोर
पोलिस स्टेशनमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी आहेत, हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याचा दावा नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.
कापड बाजारातील दुकान खाली करण्याकरता लोक येतात व त्याची तोडजोड करण्याचे काम पोलिस स्टेशनमध्ये होते. तोडजोड करणारी गँग पोलिसांची तयार झाली आहे,
असेही त्यांचे म्हणणे असून, जिल्ह्यामध्ये व शहरांमध्ये जे चालले आहे, ते पाहता पोलिसांवर कोणाचा धाक आहे की नाही, हे सुद्धा तपासणीची वेळ आली आहे. घडलेल्या घटनांचा तपास पूर्ण होत नसेल तर त्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे, पण ते न स्वीकारता दिवसभर कलेक्शन करण्यात पोलिस व्यस्त आहे, तडजोड गँगवर कारवाई होत नाही. त्यामुळे या घटना शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या लागतील, असा इशाराही आमदार जगताप यांनी दिला आहे.
बुरुडगाव रोडवरील साईनगर भागात होणाऱ्या चोऱ्यांचा व दरोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारे नागरिकांचे निवेदन आ. जगताप यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले. यावेळी बोलताना, पोलिस स्टेशनमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी, असा सवाल आ. जगताप यांनी केला.
आ. जगताप पुढे महणाले की शहर पूर्वी ११ वाजता बंद केले जायचे. मात्र आता नाईटला परवानगी दिली काय? असा प्रश्न पडला आहे. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत शहरामध्ये वर्दळ दिसते. काही वेगळ्या विचाराचे लोक बस स्थानकावर फिरत असतात. त्यांचे तेथे काय काम असते? हे कुठल्यातरी वेगळ्या भागात राहात असतात हेच खरे दरोडेखोर आहेत.
पोलिसांनी त्यांच्या गाडीची कागदपत्र तपासली पाहिजेत. बिगर नंबर प्लेटच्या गाड्यांवर फिरत असतात. पोलिसांनी त्यांना तपासले पाहिजे, शहरात गस्त वाढवली पाहिजे, जे पोलिस स्टेशनचे प्रमुख अधिकारी आहेत, यांच्या भोवताली जे कर्मचारी गोळा झाले आहे, ती फक्त अवैध धंद्यांशी संपर्क असणारी लोकं आहेत व त्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. पीआय लोकांना जेवायला घेऊन जातात आणि तिथे डिलिंग करतात, अशी माहिती पोलिस अधीक्षकांना सांगितली असून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
साईनगर परिसरातील योगेश चंगेडिया यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे पळून जावे लागले. बामध्ये कुठलेही पोलिसांचे योगदान नाही. पोलिस उलट तासभराने आले, असा दावा करून, पोलिस अधिकारी व कर्मचारी गँगवर कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. जर अधीक्षकांनी कारवाई केली नाही तर लोकशाही मागनि राज्य शासनाकडे तक्रार करावी लागेल, असा इशाराही आ. जगताप यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.