Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऐतिहासिक संदर्भ, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरुन 31 मे पर्यंत हटवा; संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ऐतिहासिक संदर्भ, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरुन 31 मे पर्यंत हटवा; संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
 

कोल्हापूर : कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले. 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे. या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध केला आहे. या आधी एकदा शिवप्रेमींनी तो पुतळा हटवला होता. पण प्रशासनाने तो पुन्हा त्या ठिकाणी बसवला. त्या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षणदेखील आहे. आता संभाजीराजेंनीही पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.


काय म्हटलंय संभाजीराजेंनी त्यांच्या पत्रात?
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.