सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या ६० नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन आणि ७२ कंत्राटी अधिकाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे डॉक्टर आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून वेळेत निधीच येत नसल्याने अडचण येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले नियमित वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. या ६० नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार देण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांची मागणी शासनाकडे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र त्यातील सुमारे २ कोटी ५० लाख रुपयेच प्राप्त झाले. प्राप्त निधीतून पगार देण्यासाठी हालचाली सुरू आहेत, मात्र अजूनही पगार जमा झाला नाही.
कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पगार देण्यासाठी शासनाकडे २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. मात्र अद्याप एक रुपयाचाही निधी प्राप्त झाला नाही. निधी कधी मिळेल याबाबत प्रशासनाकडे ठोस याबाबत माहिती नाही. त्यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
दोन दिवसात पगार होतील : डॉ. वाघ
कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारासाठी निधीची मागणी केली आहे, मात्र निधीच मिळाला नाही. नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार पुढील दोन-तीन दिवसांत होतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.