सांगलीत मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करा आमदार सुधीरदादा गाडगीळ: मुख्यमंत्री, पणनमंत्र्यांकडे मागणी
सांगली, दि.20 : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन आवश्यक असून जत,कवठेमहांकाळ आणि मिरज या तीनही तालुक्यांसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तातडीने स्थापन करावी, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात चर्चा केली आणि त्यांना तसे निवेदनही दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि नामदार रावल यांनी या विषयाकडे तातडीने लक्ष देण्यात येईल, असे आमदार गाडगीळ यांना सांगितले.
सांगली बाजार समिती आणि मिरज तालुक्यावरील अन्याय दूर करण्यासाठी तातडीने त्रिभाजन आवश्यक आहे, असेही निवेदनात आमदार गाडगीळ यांनी म्हटले आहे. आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच पणनमंत्री रावल यांना दिलेली माहिती अशी: सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी जत, मिरज आणि कवठेमहांकाळ अशा तीनही तालुक्याची मिळून सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली होती. परंतु कालांतराने या बाजार समितीचे विभाजन होणे अत्यावश्यक होते. सन २००६ पासून हा विषय आणि त्रिभाजनाची मागणी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. या संदर्भात सांगली चेंबर ऑफ कॉमर्सनेही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी केली आहे. न्यायालयानेही यासंदर्भात शासनाला कार्यवाहीचे आदेश त्यावेळीच दिले होते; परंतु केवळ राजकीय दबावामुळे अद्यापी बाजार समितीचे त्रिभाजन झालेले नाही.
जत,कवठेमहांकाळ आणि मिरज या तीन तालुक्यांसाठी मिळून बाजार समिती स्थापन झालेली असली तरी प्रामुख्याने बाजार समितीचा व्यवहार आणि शेतीमालाची आवक व विक्री ही सांगलीमध्येच होत असते. बाजार समितीच्या उत्पन्नाचा मुख्य( जवळजवळ सर्व) स्त्रोत सांगलीमध्येच आहे. परंतु जत आणि कवठेमहांकाळचा बाजार समितीत समावेश केल्यामुळे बाजार समितीला जत, ढालगाव आणि कवठेमहांकाळ येथील दुय्यम बाजारासाठी सांगलीतील उत्पन्नाच्या८० टक्के हिस्सा अवाजवी खर्च करावा लागतो. परिणामी सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये अत्यावश्यक अशा नागरी सुविधा पुरवणेही बाजार समितीला शक्य होत नाही. त्यामुळे सांगली बाजारपेठेत येणारे शेतकरी, व्यापारी तसेच अन्य कर्मचारी यांची सतत कुचंबणा होत आहे. त्यांच्यावर उघड उघड अन्याय होत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सध्याचे कार्यक्षेत्र शंभर किलोमीटर एवढे आहे. राज्यातच नव्हे;तर संपूर्ण या जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाली आहे. इस्लामपूर, शिराळा, पलूस ,खानापूर (विटा), आटपाडी अशा तालुकास्तरीय बाजार समित्या खूप पूर्वीच स्थापन झाल्या आहेत. परंतु केवळ राजकीय दबावापोटी सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करण्याची टाळाटाळ केली जात आहे. जत, कवठेमंकाळ या तालुक्यांमध्ये तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती आणि विकास सोसायटीची संख्या अधिक असल्यामुळे तेथील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सांगली बाजार समितीवर निवडून येतात. ते त्यांच्या भागातील दुय्यम बाजार समित्यांवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा बहुतांश निधी खर्च करतात तसा आग्रह धरतात. त्यामुळे सांगली बाजार समिती तसेच मिरज तालुक्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे तातडीने मिरज तालुक्यासाठी सांगली ही स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात यावी. जत आणि कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र बाजार समिती तातडीने स्थापन करावी अशी शेतकरी, व्यापारी तसेच सर्व संबंधित कर्मचारी यांची मागणी आहे. सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमधील पाणीपुरवठा, कचरा उठाव, रस्ते, ड्रेनेज अशा मूलभूत नागरिक सुविधा पुरवण्यासाठी हे त्रिभाजन अत्यावश्यक आहे, असेही गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.