Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता, हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता, हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.
 

सांगली, दि. 22 : बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियानांतर्गत टाकलेल्या धाडसत्रामध्ये इस्लामपूर येथील हॉटेल शंकरा, आष्टा नाका येथून एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता करण्यात आली असून, सदर आस्थापना मालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (F. I. R.) नोंदवण्यात आल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निर्देशानुसार व सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ व सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले.  संबंधित हॉटेल मालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (F. I. R.), भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.), २०२३ कलम १४६ व अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ कलम ७९ अंतर्गत दाखल करण्यात आला. तद्‌नंतर सदर किशोरवयीन कामगारास सुरक्षिततेकरिता दादुकाका भिडे, मुलांचे बालगृह येथे दाखल करण्यात आले.


दुकाने निरीक्षक चंद्रकांत साळुंखे यांच्या नेतृत्त्वात यांचे नेतृत्वात जिल्हा चाईल्ड लाईनच्या समुपदेशक श्रीमती प्रियांका माने, जिल्हा परिषदेचे समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण) जिल्हा समन्वयक प्रशांत शेटे, होमगार्डचे वरिष्ठ पलटण नायक महादेव देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. यु. आर. जुगळे यांनी ही संयुक्त कार्यवाही केली.  14 वर्षापेक्षा कमी वयातील बालकास कोणीही आस्थापनेत कामावर ठेऊ नये. तसेच 14 ते 18 वर्षादरम्यानच्या किशोरवयीन कामगारास कोणत्याही धोकादायक आस्थापनेत कामाला ठेऊ नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.